लातूर हे भारतातील असं शहर आहे की, ज्या शहरात पाण्याचे दुर्भिक्ष कायमचा विषय आहे. याची तीव्रता उन्हाळ्यात मात्र अधिकच जाणवते. दुष्काळाच्या दाहापेक्षा पाण्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या झळा लातूरकरांना अधिक सहन कराव्या लागत आहेत. सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या लातूरकरांची ही व्यथा संपता संपत नाही.
पिण्याच्या पाण्यासाठी आणि सांडपाण्यासाठी दररोज करावा लागतोय मोठा खर्च
लातूरमधली सहारा क्लासिक हाउसिंग सोसायटीच्या इमारतीत 26 कुटुंब राहतात. बोरचे पाणी मार्चमध्ये आठले आहे. त्यावेळेसपासून दररोज सातशे रुपये टँकर प्रमाणे तीन ते चार टँकर पाणी त्यांना विकत घ्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी 10 रुपये पासून 20 रुपयेप्रमाणे विकत घ्यावं लागत आहे. आता हा वाढीव खर्च येत आहे. सात दिवसात नळाला पाणी येत आहे. सांडपाण्यासाठी दररोज 2100 रुपये चा खर्च या हाऊसिंग सोसायटीला करावा लागतो. तब्बल एका सोसायटीचा खर्च साठ हजार रुपये आहे. पिण्याच्या पाण्याचा खर्च चाळीस हजार रुपये गृहीत धरला तर एका हाऊसिंग सोसायटीला महिन्याचा एक लाख रुपये चा खर्च हा फक्त पाण्यावर करावा लागत असल्याचं वास्तव आहे.
बांधकामांनाही विकतच पाणी
लातूर शहरात येणारे मुख्य चार रस्ते आहेत. बार्शी रोड, आंबेजोगाई रोड, औसा रोड आणि नांदेड रोड. शहरात येणाऱ्या या चार मुख्य रस्त्यावरच शहर वसले आहे. या शहराच्या चारही रस्त्याच्या अनेक भागात विविध भागात विहिरी आहेत. बोअर आहेत. या भागातून टँकरद्वारे पाणी लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. 400 पासून 700 रुपयांपर्यंत टँकरला लोकांना पैसे मोजावे लागतात. टँकर चालक 150 ते 200 रुपयांना पाणी विहीर मालकाकडून विकत घेतात. अशा टँकर चालकांची संख्या जवळपास 600 ते 700 च्या आसपास आहे. प्रत्येक टँकर चालक दिवसाला किमान पाच ट्रिप तरी करत असतात. शहरात सुरु असलेल्या अनेक बांधकामांनाही विकतच पाणी घ्यावे लागण्याची वेळ आली आहे. यातूनच दररोज लाखोंची उलाढाल होत असते.
लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा
लातूरमध्ये लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी आरो फिल्टरचा पाणी विक्रीचा व्यवसाय ही तेजीज आहेत. या ठिकाणी वीस लिटरच्या जारला दहा रुपये. थंड झाला तर वीस रुपये याप्रमाणे दर आकारणी होते. या ठिकाणावरुनही मोठ्या प्रमाणात पाणी विक्रीचा व्यवसाय जोर धरत आहे. लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे सात दिवसानंतर लातूरला पाणीपुरवठा केला जात आहे. यापूर्वी सात दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, पाणी खूप वेळ येत होतं. लातूरमधील प्रत्येक घरामध्ये पाणी स्टोअर करण्याची क्षमता मोठी आहे. कमी वेळ येत असलेल्या पाण्यामुळं पाण्याची कमतरता जाणवत आहे. यातूनच मग टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय उरत नाही. टँकर व्यवसायामुळं नाही म्हणलं तरी किमान पाच हजार लोकांच्या हाताला कामही मिळालं आहे. मात्र, या व्यवसायातून होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत लातूरकर होरपळून निघत आहेत.
ग्रामीण भागातही दुष्काळाच्या झळा
लातूरच्या पाण्याचा भार आता 26 टँकर आणि 359 विहरीवर आहे. तरीही ऑक्टोबरपर्यंत पाणी पुरेल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी 359 विहरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रेणापूर, निलंगा, औसा व जळकोट या तालुक्यात टँकर चालू आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईसदृश भागात विहीर आणि बोर यांचे अधिग्रहण केले गेले आहे. यामुळे पाणी टंचाईच्या झळा जास्त जाणवणार नाहीत असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले आहे. मात्र याच्या उलट जिल्ह्यातील अनेक गावात दिवस दिवस पाण्याच्या टँकरची वाट पाहत ग्रामस्थ बसलेले पाहायला मिळत आहे.