पंढरपूर – सध्या सुरु असलेल्या नाताळच्या सुट्यांमुळे धार्मिक पर्यटनासाठी येथे मोठी गर्दी होत आहे. पोलिसांकडून भाविकांच्या वाहनांना कोणतीही शिस्त लावली जात नसल्यामुळे शहारातील चौफाळ्यांसह महत्त्वाच्या प्रत्येक चौकामध्ये वारंवार वाहतूकीची कोंडी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य पंढरपूरकर नागरिक वैतागून गेलेला आहे. सर्रास भाविकांची चारचाकी वाहने मंदिर परिसरात येत असल्यामुळे वाहतूक पोलिस कुठे आहेत ? पोलिसांची वाहतूक शाखा करते काय आहे ? असे एक ना अनेक संतप्त सवाल सर्वसामान्य पंढरपूरकरांमधून उपस्थित केले जात आहे.
सध्या नाताळाच्या सुट्टींचे दिवस आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटना बरोबरच विठुरायाच्या दर्शनासाठी परगावांहून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शहरातील सर्व मठ,धर्मशाळा, भक्तनिवास, भाविकांच्या गर्दीने फुल्ल झालेली दिसत आहेत. त्यामुळे भाविकांनी आणलेली चारचाकी वाहने चक्क बिनदिक्कपणे पार्किंग ऐवजी रस्त्यांवरच दिसत आहे. त्यामध्येच काही वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे शहरात वारंवार वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. या मध्ये भरीसभर म्हणून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे रोजच छोट्या, मोठ्या अपघाताला देखील निमंत्रण दिले जात असल्याचे गेल्या काही दिवसां पासून दिसून येत आहे. मात्र वाहतूक पोलिस हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून देखील बेजबाबदार वाहनचालकांवर कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत ही मात्र आश्चर्याची गोष्ट आहे.
शहरातील विठ्ठल मंदिराच्या पश्चिमव्दारा समोरच चौफाळा चौक आहे. त्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक या बरोबरच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, अर्बंन बँक, संतपेठ, सांगोला रस्ता चौक, भादुले चौक, नाथचौक आदी महत्वाच्या परिसरात मोठमोठी दुकाने, रुग्णालये, हॉटेल, महाविद्यालय, मैदान आहेत. या परिसरात भाविकांच्या वाहनांची देखील नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात दिवसरात्र रहदारी असते. त्यामानाने शहरात पार्किंगच्या व्यवस्था अपुऱ्या आणि तोकड्या आहेत. त्यामुळे भाविकांकडून सर्रासपणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरच गाड्या पार्किंग केल्या जातात. अगदी नगरप्रदक्षिणा रस्त्यावर देखील या पेक्षी वेगळी परिस्थिती दिसत नाही.
दरम्यान तुळजापूर, अक्कलकोट येथे परगावाहून येणाऱ्या भाविकांच्या गाड्या सर्रास शहराबाहेर पार्किंगच्या ठिकाणी थांबवाव्या लागतात. त्यानंतरच चालत भाविकांना त्या त्या ठिकाणच्या देवतांचे दर्शन करता येते. मात्र पंढरपूरात परिस्थिती अगदी उलटी दिसत आहे. भाविकांची मोठी वाहने देखील अगदी चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गावभागात सोडली जातात. त्यामुळे गर्दीच्या वेळी म्हणा किंवा ऐरव्ही देखील शहराच्या प्रत्येक चौकाचौकांमधून वाहतूकीची कोंडी होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्य पंढरपूरकर वारंवार होणाऱ्या या वाहतूकीच्या कोंडीला जाम वैतागून गेल्याचे दिसत आहे. ऐरव्ही रस्त्यांच्या कडेला शहरातील नागरिकांचे नजरचुकीने वाहन आढळल्यास बेमालुमपणे चालन फाडणारे वाहतूक पोलिस ऐन गर्दीच्या वेळी कुठे असतात असा संतप्त सवाल शहरवासियांकडून आता विचारला जात आहे.
————————
वारंवार वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे
शहरातील प्रमुख अंबाबाई पटांगण, जुनीपेठ,नवीन पेठ, चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळामारुती चौक,कालिका देवी चौक, भजनदासचौक, गजानन महाराज मठ परिसर, संपुर्ण प्रदक्षिणा रस्ता, स्टेशन रोड, केबीपी काँलेज रस्ता, अहिल्यापुल रस्ता, तहसील कचेरी समोरील रस्ता, भक्तीमार्ग, अर्बंन बँक मुख्य शाखा रस्ता, भादुले चौक, नगरपालिका समोरील रस्ता, संतपेठ, सांगोला चौक रस्ता, गोपाळपूर रस्ता, विवेक वर्धिनी समोरील रस्ता, अंबाबाई पटांगण या शिवाय शहर परिसरातील इतर काही रस्त्यांवर देखील वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे.
———————–
स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा बंद अवस्थेत
नागरिकांच्या घामाच्या (कररुपातील ) पैशातून लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेली स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा देखील अनेक वर्षापासून बंद अवस्थेतच आहे. ही स्वयंचलित सिंग्नल यंत्रणा सुरु ठेवल्यास मुख्य सावरकर चौक, स्टेशन रस्ता येथील वाहतूकीला बऱ्या शिस्त लागण्यास मदत होईल.



















