सोलापूर – येथील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे तर उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथील प्रा.डॉ. अनिल गहिनीनाथ कांबळे, प्रशालेच्या मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, प्रशालेचे वरिष्ठ लिपिक कांचन आगावणे सांस्कृतिक भाग प्रमुख माधवी खोत यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रशालेच्या सहशिक्षिका सोनाली उंडे व पल्लवी खांडवे यांनी गायलेल्या सुमधुर गीताद्वारे पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.राज्य व जिल्हा पातळीवर क्रीडा क्षेत्रात प्रशालेचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडूंनी आणलेल्या मशालीद्वारे क्रीडाज्योतीचे प्रज्वलन, क्रीडांगणाचे पूजन व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.इयत्ता आठवी अ व ब तील विद्यार्थ्यांनी आरएसपी, स्काऊट गाईडच्या माध्यमातून शिस्तबद्ध पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांनी मनुष्याचे शरीर हीच सर्वात महत्त्वाची संपत्ती असून, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा सप्ताहात खेळ खेळताना खिलाडूवृत्ती दाखवावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रमुखअतिथी प्रा.डॉ.अनिल कांबळे यांचा परिचय प्रशालेतील सहशिक्षक अनुप कस्तुरे यांनी दिला. प्रशालेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांनी मागील वर्षी प्रशालेने विविध क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या बक्षिसांचे वार्षिक अहवालाच्या माध्यमातून वाचन केले.
इयत्ता पाचवी, सहावी,सातवीतील विद्यार्थ्यांनी यावेळी आकर्षक अशा शारीरिक कवायत, रिंग कवायत,झेंडा कवायत, घुंगरू काठी कवायत,डंबेल्स यांचे प्रशालेतील सहशिक्षक प्रवीण कंदले यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी नेत्र दीपक सादरीकरण करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. सोलापूरचे पारंपरिक लोकनृत्य म्हणून लेझीमचा उल्लेख करावा लागतो. सहशिक्षक सुकुमार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीमच्या सादरीकरणाच्या वेळी अक्षरश: विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधान आले होते. सोलापुरी संबळच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला.यावेळी झांज या कवायत प्रकाराचे इयत्ता नववी अ तील विद्यार्थ्यांनी सहशिक्षक अभिनंदन उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली नयन मनोहर असे प्रात्यक्षिक सादर केले. ब्राझील या परदेशी नृत्याचे सादरीकरणही प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सहशिक्षिका पल्लवी खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षण देण्यासाठी कराटे व मन संतुलनासाठी सूर्यनमस्कार,योगाचे धडे दिले जातात. त्याचेही प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतद्वारे अमूल्य असे मार्गदर्शन केले. अशा प्रकारचा क्रीडा महोत्सव यापूर्वी मी पाहिला नसल्याचे सांगून त्यांनी प्रशालीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. विद्यार्थ्यांनी निरोगी जीवन जगण्यासाठी खेळ खेळलेच पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला.प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांनी मागील वर्षातील प्रशालेचा क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आलेख(अहवाल)सादर केला.
या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांनी कार्यक्रमाची सुंदर नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अभिजीत पाटील तर आभार माधवी खोत यांनी मानले. क्रीडा सप्ताह उद्घाटन समारंभ यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


























