सोलापूर – शहरातील ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त शनिवार पहाटेपासून श्रद्धा, शांतता आणि एकतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. शेकडो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि “सर्वांसाठी सुख-शांती” अशी प्रार्थना अल्लाहकडे मागितली.
रमजान महिन्याभराच्या संयम, त्याग आणि आध्यात्मिक साधनेनंतर आलेल्या ईदने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण केले. महिनाभर रोजे पाळत, कुरआन पठण करत आणि स्वतःला शिस्तीत ठेवत मुस्लीम बांधवांनी आत्मशुद्धी साधली. त्याचबरोबर ईदपूर्वी जकात आणि फित्रा देत समाजातील गरजू, वंचित घटकांनाही सणाचा आनंद मिळावा याची काळजी घेतली.
ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर मोठी गर्दी उसळली होती. सर्वांनी एकत्र नमाज अदा करत “एकता, समता आणि बंधुभाव” यांचा संदेश दिला. नमाजनंतर एकमेकांना मिठी मारत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देण्यात आल्या, ज्यातून सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसले.
होटगी रोड परिसरात आलमगीर ईदगाह येथे शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी सामूहिक नमाज अदा केली.
एकंदरीत रमजान ईदनिमित्त सोलापूर शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवीन कपडे परिधान करून मुस्लीम बांधव ईदगाहकडे मोठ्या आनंदात रवाना होत होते.
ईदची नमाज संपल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बंधुभाव आणि आपुलकीचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. अनेकांनी एकमेकांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत पारंपरिक सुरकुर्मा आणि गुलगुले यांचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह केला.
पांगल मैदान येथील शाही आलमगीर ईदगाह येथे सकाळी 9 वाजता नमाज पठण करण्यात आली.येथे मौलाना सय्यद अहमद गौरी हैद्राबादी यांनी नमाज नंतर सामूहिक प्रार्थना केली. यानंतर येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेत ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.






















