अक्कलकोट – दिवाळी सण गोडवा करण्यासाठी शेतकऱ्यांचा खात्यावर दिवाळीपूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते.परंतु अर्धी दिवाळी संपली असताना अद्याप एक दमडीही दिले नसल्याने लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली आहे. सरकाराच्या जीवावर दिवाळी सण होणार नसल्याने अनेक शेतकरी व्याजानं काढून दिवाळी करण्यासाठी धडपड केले. मात्र बाजारातून उदार कोणही द्यायला तयार नसल्याने पावसाने झोडपले, शासनाने फसविले तर शेतकरी दाद मागायचा कोणाकडे? अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
दिवाळी सण सुरू होऊन अर्धी दिवाळी संपली असताना, अतिवृष्टीचे पाच पैसेही अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सरकारकडून कोट्यवधी रूपयांची मदतीची घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात एक दमडीही न मिळाले नाही. दिवाळी सणात बाळगोपाळांना दोन गोड घास कसे भरवायचे, या विवंचनेत शेतकरी आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.
अतिवृष्टी पावसामुळे हात उसने कर्ज बाजरी करून जोपासलेले पिके मातीमोल झाली, पिकांसह शेतीही वाहून गेली, सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या खरीपची पिके महत्वाची असतात, त्यावरच त्याचे वर्षभर प्रपंच चालते. यंदा पिके बहरली असतांनाच अचानक अस्मानी संकट कोसळले. होत्याचे नव्हते झाले.शासकीय पातळीवरून मदतीची मोठी घोषणाही करण्यात आली. दिवाळीच्या आत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले. लवकरच मदत मिळेल, असा आशेचा किरण मनात ठेऊन बसलेला शेतकरी निराशेच्या अंधारात बुडाला आहे. यामुळे धान्य दुकाने, कापड बाजार, ओस पडले आहेत. शेतात पिकेच नसल्याने कोणताही व्यापारी उधारीवर व्यवहार करायला तयार नाही. बँकांची कोणत्याही कर्जाला नकार घंटा आहे. सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे. दिवाळी सणात बाळगोपाळांना दोन गोड घास कसे भरवायचे, या विवंचनेत शेतकरी आहे. खर्चासाठीही त्यांची ओढाताण सुरू असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दीपावली सण अंधारात गेली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान प्रचंड झाले आहे. अर्थचक्राचा आर्थिक कणा मोडला आहे. मदतीच्या पोकळ घोषणाबाजीने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दिवाळी करायची कि होळी, असा प्रश्न सतावतो आहे. मायबाप सरकारला शेतकऱ्यांची ‘किव’ कधी येणार ? हा खरा सवाल आहे.
अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी अपलोड करण्याचे काम सध्या चालू आहे.अजून सात दिवसा नंतर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची खात्यावर अनुदान जमा होतील.किणी मंडळाचे गेल्या महिन्यात जमा झालेली शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान भरपाई सात दिवसापूर्वी अपलोड केले होते.ते आता काल पासून शेतकऱ्यांचा खात्यावर अनुदान जमा होत आहे.
– विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट
मे महिन्यात जोरधार पाऊस कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला महागडे खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पेरणी केली. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी पावसाने सारे धुऊन गेले. मे महिन्यापासून केलेला सगळे खर्च वाहून गेला आहे. आता पावसाने उघडीप दिली असली तरी बहुतांश क्षेत्रावर रब्बीही येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रासाठी मदतीच्या रकमेत शासनानी वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.