सोलापूर – योग्य वेळी दिलेले प्राथमिक उपचार हे अपघातग्रस्त किंवा अचानक आजारी पडलेल्या रुग्णाच्या जीवासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. सामान्य नागरिकांनीही प्रथम उपचारांचे मूलभूत ज्ञान आत्मसात केल्यास अनेक मौल्यवान जीव वाचू शकतात, असे प्रतिपादन चिडगुपकर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मीनल चिडगुपकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील महिला विकास कक्षाच्या वतीने “स्वयंरक्षण आणि प्रथमोपचार” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत डॉ. मीनल चिडगुपकर यांनी प्रथमोपचार विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. अंजना लावंड, डॉ. ज्योती माशाळे, लक्ष्मी आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. चिडगुपकर म्हणाल्या की, रस्ते अपघात, हृदयविकाराचा झटका, भाजणे, रक्तस्राव, बेशुद्धावस्था अशा आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत दिलेले प्रथम उपचार रुग्णाच्या जीवासाठी निर्णायक ठरतात. योग्य पद्धतीने सीपीआर, रक्तस्राव थांबविणे, जखमांवर तातडीचे उपचार, तसेच रुग्णाला सुरक्षित स्थितीत ठेवण्याचे ज्ञान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात स्वयंरक्षण विषयावर संगीता जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थिनी आणि महिलांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री मोहिते-जाधव व सुप्रिया अनुभुले यांनी केले तर आभार ज्योती कोकणे यांनी मानले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे स्वयंरक्षण आणि प्रथमोपचार या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेत डॉ. मीनल चिडगुपकर यांनी प्रथमोपचार विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. अंजना लावंड, डॉ. ज्योती माशाळे, लक्ष्मी आढाव.



















