सातारा – श्री आनंद नटराज व शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने आणि श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य विद्यमान पीठाधीपती श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती स्वामी यांचे पूर्णानुग्रह आणि शुभाशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा सोमवार,29डिसेंबर 2025 ते शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 दरम्यान संपन्न होत आहे.
सोमवार,29डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता मंदिरात ध्वजारोहण व प्रधान संकल्प संपन्न होणार आहे .त्यानंतर मंगळवारी दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत पुण्याहवाचन, गणपती होम , नवग्रह होम , तसेच सायंकाळी राधाकृष्ण यांचा विवाह सोहळा अर्थात कल्याण उत्सव संपन्न होणार आहे. बुधवार दि.31 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत घटस्थापना मंदिरातील सर्व देवतांचे मूलमंत्र ,जप, होम, पूर्णाहूती व आरती होणार आहे.
दरम्यान गुरुवार,दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 12 या वेळेत होम हवन, आरती, प्रसाद होऊन दुपारी 3 ते 6 या वेळेत मंदिरातील श्री महागणपतीचा रथोत्सव आणि दीपोत्सव सोहळा होणार आहे.या रथोत्सव कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांंबरोबरच रथ पूजन व रथप्रस्थानाचा मुख्य सोहळा शुक्रवार दि. 2 जानेवारी 26 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.
या रथोत्सवाचे पूजन श्री. एस्. कार्तिकेयन् आय.ए.एस.,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापुर व त्यांची सुविद्य पत्नी सौ. यासिनी नागराजन्, आय.ए.एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.आणि सौ. एस. एस. मांजरेकर,सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा विभाग, सातारा.आणि श्री. मुरली श्रीनिवासन व त्यांची सुविद्य पत्नी सौ. सुधा मुरली, ठाणे, मुंबई.यांच्या शुभहस्ते या रथाचे पूजन होणार आहे .
या उत्सवातील मुख्य रथोत्सवाचा कार्यक्रम होऊन पहाटे पाच वाजता गणपती होम व मूर्तीचे यात्रा दान होऊन शुक्रवार दि.2 जानेवारी 26 रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत रथ पूजन आणि रथ प्रस्थान होणार आहे .संपूर्ण सातारा शहरातून हा रथ नटराज मंदिरातून बाहेर पडल्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानावरून साई मंदिर, गोडोली तेथून पोवई नाका, नगरपालिका चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे मोती चौकातून राजवाडा येथे येऊन त्यानंतर मोती चौकातून सदाशिव पेठ मार्गे, 501 पाटी, शनिवार पेठ मार्गे पोलीस मुख्यालयावरून ,पोवई नाका येथे येऊन त्यानंतर कुबेर गणपती मंदिर मार्गावरून डीएसपी बंगला तसेच पुन्हा नटराज मंदिरात सायंकाळी सहा वाजता परत येणार आहे .
सायंकाळी रथ आगमन झाल्यावर भक्तांच्या उपस्थितीत महामंगल आरती व प्रसाद वितरण होणार असून शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत पुणे येथील राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टच्या वतीने श्री नटराज देवाला महाअभिषेक, लघुरुद्र व शिवकाम सुंदरी व नटराज यांचा कल्याणउत्सव अर्थात लग्नसोहळा संपन्न होऊन त्यानंतर आरती व महाप्रसाद वितरण होणार आहे .
हा रथोत्सव मंदिराच्या वतीने जनता जनार्दनाच्या देणग्यांमधून केला जातो. सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने तन- मन- धनाने सहभागी व्हावे व आनंद घ्यावा असे आवाहन नटराज मंदिर चे समस्त विश्वस्त ,रथोत्सव सेवा समितीचे सदस्य व व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.























