सोलापूर – पित्याच्या स्मृती जतन करणे हे केवळ कौटुंबिक कर्तव्य नसून, तो एक सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्याचा उदात्त प्रयत्न आहे. कै. सिद्धा पाटील स्मृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘संगीत संध्या’ ही केवळ एक मैफल न राहता, ती कृतज्ञता आणि स्मरणाचा एक अनोखा सोहळा ठरली. या स्वरमयी अभिवादनातून सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडली आहे.
कै. सिद्धा पाटील स्मृती समिती आणि नाट्य आराधना, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सिद्धा पाटील यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य टिळक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी प्रफुल्लचंद्र आहेरकर यांचे प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नाट्यकलाकार विजय साळुंखे व ज्येष्ठ प्रकाश योजनाकार शशिकांत बटणे यांना ‘स्मृतीगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इरेश स्वामी सर होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ इरेश स्वामी भावूक होऊन म्हणाले की, “एखाद्या व्यक्तीच्या पश्चात त्यांच्या स्मृती संगीताच्या माध्यमातून जागवणे, ही त्यांना वाहिलेली सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. सिद्धा पाटील यांचे कलाप्रेम त्यांच्या वारसांनी अशा पद्धतीने जिवंत ठेवले आहे, हे कौतुकास्पद आहे. आजच्या धावपळीच्या युगात अशा शास्त्रीय आणि निखळ सांगीतिक कार्यक्रमांची समाजाला मोठी गरज आहे. कलाकारांचा सन्मान करणे म्हणजे संस्कृतीचे संवर्धन करणे होय.”
कार्यक्रमाची सुरुवात राग मारुबिहागने झाली. ‘छोटा ख्याल’, ‘तीनताल’ आणि ‘तराना’ सादर करत कलाकारांनी शास्त्रीय संगीताचा कस दाखवला. त्यानंतर नाट्यसंगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या कानडी भजनाने आणि ‘पावलो पंढरी वैकुंठ भुवन’ या राग तिलंगमधील रचनेने आध्यात्मिक वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाचा कळस ‘विठ्ठल विठ्ठल’ गजरीने झाला, ज्याने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.
या मैफलीत तबल्यावर नितीन दिवाकर तर संवादिनीवर ओंकार पाठक यांनी आपल्या बहारदार साथीने रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मंजुषा गाडगीळ यांनी केले. याप्रसंगी मल्लिनाथ पाटील, अँड. आर. एस. तथा बाबू पाटील आणि पाटील परिवारातील सदस्यांनी सर्व कलाकार व पाहुण्यांचे स्वागत केले.
या सोहळ्याला सोलापूर शहरातील संगीतप्रेमी, रंगकर्मी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृतज्ञतेची भावना आणि सुरेल कलाविष्काराचा हा संगम उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

















