अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीतर्फे ‘एनएस-२५’ या मोहिमेवर पर्यटक म्हणून अंतराळाची सफर करण्यासाठी सहा जणांची निवड करण्यात आली आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे यात भारतीय वंशाचे उद्याोजक आणि वैमानिक गोपीचंद थोटाकुरा यांचाही समावेश आहे. गोपीचंद थोटाकुरा हे भारतीय अंतराळ पर्यटक ठरले आहेत. तर, राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय असणार आहेत. राकेश शर्मा यांनी एप्रिल 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सोयुझ टी-११ या अंतराळ यानातून ऐतिहासिक प्रवास केला होता.
ब्लू ओरिजिनचे ‘एनएस-२५’ ने १९ मे रोजी (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता) अंतराळाच्या दिशेने उड्डाण केले. हे मिशन न्यू शेपर्ड प्रोग्रामसाठी सातवे मानवी उड्डाण असून त्याच्या इतिहासातील २५ वे आहे. या मोहिमेसाठी सहा क्रू सदस्यांची निवड करण्यात आली असून यात गोपीचंद थोटाकुरा यांचाही समावेश आहे. तसेच जगभरातील इतर पाच अंतराळवीर क्रू सदस्यांचा समावेश आहे.
गोपीचंद थोटाकुरा यांच्याविषयी थोडक्यात माहिती …
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जन्मलेले गोपीचंद थोटाकुरा हे एक उद्योजक आणि पायलट आहेत.
थोटाकुरा यांनी बंगळुरुमधील सरला बिर्ला अकादमी या खाजगी शाळेत शिक्षण घेतले आहे.
त्यानंतर त्यांनी डेटोना बीच, फ्लोरिडा येथील एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीमधून एरोनॉटिकल सायन्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली.
तसेच थोटाकुरा यांनी एमिरेट्स एव्हिएशन युनिव्हर्सिटी आणि कोव्हेंट्री युनिव्हर्सिटीमधून एमबीएची पदवी देखील मिळवली.