दिवसेंदिवस वाढत असलेली गरमी आणि उष्ण हवामानाचा परिणाम हापूस आंब्यावर झाला आहे. कोकणातील हापूसची आवक घटत चालली आहे. उष्णतेमुळे आंबे आधीच पिकल्याने हंगाम लवकर सुरू झाला होता. त्यामुळे यंदा नेहमीच्या तुलनेत हापूसचा हंगाम १५ ते २० दिवस आधीच संपणार आहे.
बाजारात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून आवक होत असून सिंधुदुर्ग येथून काही प्रमाणात माल येत आहे. दरवर्षी १५ जूनपर्यंत रत्नागिरीहून तुरळक आवक सुरू असते. परंतु यंदा ही आवक पुढील काही दिवसच होणार असल्याचे आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार बाजारात मागील आठवड्यात दीड ते दोन हजार पेटी होणारी आवक आता हजार ते बाराशे पेट्यांपर्यंत आली आहे. ही आवक आणखी घटत जाणार आहे. आवक घटली असली तरी भाव मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तयार आंब्याच्या चार ते सात डझनाच्या पेटीला १५०० ते २५०० रुपये इतका भाव मिळत आहे.
आंबा व्यापारी युवराज काची यांनी सांगितले की, अवकाळीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका रत्नागिरी हापूसच्या आवक आणि विक्रीवर झाला आहे. यंदा अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे हवामान बदलले आहे. बाजारात तयार आंबा उपलब्ध असूनही ग्राहकांकडून खरेदीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.