बार्शी – पुरोगामी चळवळीने जातीअंताची दिशा निश्चित केली असली तरी समाजात जातीयतेचे अस्तित्व नव्या स्वरुपात वाढताना दिसते, ही चिंताजनक बाब आहे. जातीमध्ये कोणतीही पवित्रता नसताना तिचे गौरवीकरण होणे दुःखद आहे. एकेकाळी विचार आणि तत्त्वांना महत्त्व होते, मात्र आज पक्षांपेक्षा पक्षांतर करणाऱ्या व्यक्तींनाच महत्त्व प्राप्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. अन्यायाविरोधातील भूमिका पुढे नेण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे याचे विचार समजून घ्यावे लागतील, असे मत प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी व्यक्त केले.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सिल यांच्यावतीने बार्शी येथील आयटक कामगार केंद्रात रविवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉ. महेंद्र कदम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रा. तानाजी ठोंबरे होते. तसेच बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश बकशेट्टी व जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘सारेच दीप कसे मंदावले आता’ या विषयावर बोलताना डॉ. महेंद्र कदम यांनी सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, विचारशून्यता वाढविण्याचा प्रयत्न हा आजच्या राजकारणाचा अजेंडा बनला आहे. विचार करण्यासाठी शांतता आवश्यक असते, मात्र ती शांतताच अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत, असे त्यांनी नमूद केले. मार्क्सवाद हे जातवर्ग अंताचे शास्त्र असून ते अधिक बळकट होणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी सामाजिक विषमता, अमानवतेची उदाहरणे आणि विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली.
अध्यक्षीय समारोपात प्रा. तानाजी ठोंबरे यांनी पानसरे यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मार्क्सवादी विचार आत्मसात करुन राज्यभर कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे काम पानसरे यांनी केले. ते नावाजलेले वकील असतानाही महिन्यातील एक आठवडा व्यावसायिक कामासाठी आणि उर्वरित वेळ कष्टकरी चळवळीसाठी देण्याचा त्यांचा नियम होता.
उपक्रमशीलता, नाविन्यता आणि प्रबोधनाच्या माध्यमातून चळवळ बळकट करण्याची दिशा त्यांनी दिली. ‘कितीही अंधार असला तरी डाव्या पुरोगामी विचारांचे लोक हे आव्हान स्वीकारतील, हा विश्वास कॉ. पानसरे यांनी निर्माण केला, तो आपण पुढे नेला पाहिजे,’ असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध नखाते यांनी केले, तर प्रस्ताविक डॉ. प्रवीण मस्तुद यांनी मांडले. यावेळी विविध सामाजिक व कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























