सोलापूर : शहरातील वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हरित सोलापूरच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या ‘हरित संकल्पना’ उपक्रमातून आज वृक्षारोपण करून मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. विविध देशी व पर्यावरणपूरक वृक्षांचे रोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक जीवन चाबुकस्वार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकुलवार, उद्यान अधीक्षक स्वप्निल सोलंनकर , पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांच्यासह अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी महापौर कै. जनार्दन कारमपुरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक झाड लावून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उपमहापौर देवकर म्हणाल्या की,वृक्षारोपण हे केवळ एकदिवसीय कार्यक्रम न राहता वृक्षसंवर्धन व संगोपनावर भर देणे आवश्यक आहे.आगामी काळात शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती मोहिमा व शाळा-महाविद्यालयांत सहभागात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे सोलापूरच्या पर्यावरण संतुलनास निश्चितच चालना मिळणार आहे.
महापौर कोंड्याल यांनी नागरिकांनी वृक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























