नीट यूजी परीक्षा पेपर लीक प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबत चौकशीच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं यापूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नोटीस जारी करत 8 जुलैपर्यंत उत्तर मागवलं आहे. सुप्रीम कोर्टात आज सकाळी 11 वाजता सुनावणी सुरु होईल. मात्र, सुप्रीम कोर्टानं नीट प्रकरणात काऊन्सलिंग प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही.
सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणी प्रकरणी आम आदमी पार्टीचे खासदार, आमदार आणि नगरसेवक जंतर मंतरवर सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. आम आदमी पार्टीनं या प्रकरणी देशभरात आंदोलनाची हाक दिली असल्याची माहिती आहे.
नीट यूजी परीक्षा पेपर लीक प्रकरणात बिहारमध्ये आर्थिक गुन्हे शाखा सक्रीय झाली आहे. त्यांनी काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजता चौकशीला बोलावण्यात आलं आहे. आरोपींजवळ ज्यांची प्रवेशपत्र सापडली आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
बिहार पोलिसांनी चार मुख्य आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांकडून 30 ते 40 लाख रुपयांची रक्कम घेण्यात आली होती. परीक्षेपूर्वी प्रश्न आणि उत्तरं सांगण्यात आली होती. तेच प्रश्न 5 मेच्या पेपरमध्ये आले होते.
पोलिसांनी सापडले मागील तारखांचे चेक
बिहार पोलिसांना मागील तारखांचे 6 चेक मिळाले आहेत. हे चेक पेपर लीक करण्यासाठीचा मोबदला म्हणून दिले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी बँक खाती ज्यांच्या नावावर आहेत. त्यांची चौकशी सुरु केली आहे.
नीट परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात
महाराष्ट्र
ातही आंदोलन
राज्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. त्यामुळं ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी राज्यभरात विविध संघटनांनी केली आहे. भंडाऱ्यातही एआयएसएफ या संघटनेनं ही निदर्शनं करीत नीट परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली. भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौकात ढोलकी बजाव आंदोलन करीत एआयएसएफच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधून घेतलं.
नीट २०२४ परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी आणि झालेली परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घ्यावी यासाठी इंदापूर तहसील कार्यालयावर पालक विद्यार्थ्यांसमवेत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. नगरपरिषदेपासून जुन्या पुणे सोलापूर महामार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर दाखल झाला. यावेळी हातात विविध प्रकारचे होर्डिंग घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एन टी ए स्कॅम है अशी घोषणाबाजी ही यावेळी करण्यात आली असून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आली.