सांगोला – श्री तीर्थक्षेत्र सेवागिरी महाराज पुसेगाव (ता.खटाव) येथील यात्रेत ७८ वे हिंदकेसरी प्रदर्शन संपन्न झाले. यामध्ये सांगोला येथील हणमंत सुरवसे यांच्या प्रिया या खिलार गायीने खिलार जनावरांच्या प्रदर्शनात हिंदकेसरी किताब पटकावला.
या यशाची दखल घेत माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सुरवसे कुटुंबाच्या घरी सदिच्छा भेट देत हणमंत सुरवसे यांचा सन्मान करून प्रियाने मिळवलेल्या हिंदकेसरी किताबाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. जनावरांची निगा, आहार, प्रशिक्षण, वंशपरंपरा तसेच प्रदर्शनासाठी केलेल्या तयारीबाबत त्यांनी आपुलकीने चर्चा केली.
यावेळी हणमंत चव्हाण, शरद मोरे, सिताराम सुरवसे, अरुण सुरवसे, अजय सुरवसे, अंकुश केदार, लहू सुरवसे, विजय केदार, पोपट सुरवसे, अजित अनुसे, सुरज वाघमोडे, विजय गव्हाणे उपस्थित होते. सांगोलकरांच्या लाडक्या प्रियाने मिळवलेला हिंदकेसरी किताब हा केवळ एका गायीचा विजय नसून, देशी खिलार वंशसंवर्धनाच्या चळवळीचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. या यशाबद्दल हणमंत सुरवसे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
हिंदकेसरी प्रियाने सांगोला तालुक्याचा मान उंचावला
देशी खिलार वंशाचे जतन व संवर्धन हे काळाची गरज असून सुरवसे कुटुंबाने मिळवलेले हे यश इतर पशुपालकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. हिंदकेसरी प्रियाने सांगोला तालुक्याचा मान उंचावला आहे.
– माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील


























