सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील इरेश भागण्णा बोरुटे यांच्या घराला शॉक सर्किट होऊन अचानक आग लागली. यात संपूर्ण घर जळून भस्मसात झाले . सोने, चांदीसह, रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. मंगळवार सकाळी ६ वाजता शॉक सर्किट होऊन अचानक घराला आग लागली.आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरावरील पत्रे सुद्धा जळून खाक झाली आहे. सुदैवाने घरातील व्यक्ती बाहेर पडल्याने मनुष्य हानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच माजी तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ बोरूटे, संजू माळी व त्यांचे मित्र मंडळीं व नागरिकांनी आग विजविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले .परंतु आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. शेवटी अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझवण्यात यश मिळविले.
वीज महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे या भागात नेहमीच विजेचा दाब कमी-जास्त होत असून त्यामुळेच शॉक सर्किट सारख्या अनेक घटना घडत आहे. अशा घटना होऊन टीव्ही, फ्रिज, कुलर, आदीसह अनेक विद्युत उपकरणे जळून खाक होताना पहावयास मिळत आहे. इरेश बोरुटे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून संपूर्ण कुटुंब मोल मजुरी करून आपली उपजीविका भागवत आहे. तरी दानशूर व्यक्तीने या कुटुंबाला सढळ हाताने मदत करावी व संबंधित विभागाने बोरुटे कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंचप्पा करजगीकर केली आहे.
…
पंचायत समिती सदस्य तथा पत्रकार पंचप्पा धनशेट्टी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली व तात्काळ दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांना फोन करून घटनेची सविस्तर माहिती सांगितले. तहसीलदार जमदाडे यांनी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

























