सोलापूर – सर्वंकष लैंगिकता प्रशिक्षण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि समाजासाठी गरजेचे शिक्षण आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका केवळ शालेय पाठ्यक्रमापुरतीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यात महत्त्वाची आहे. शिक्षकांच्या सुसंस्कारित, वैज्ञानिक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा जीवनाचा अनुभव अधिक समृद्ध होईल असे प्रतिपादन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले.
त्या प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर, फॅमिली प्लॅन असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स अंतर्गत आयोजित शिक्षकांकरिता व विविध सामाजिक संस्थांच्या प्रशिक्षकांकरिता आयोजित कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेच्या माजी अध्यक्षा डॉ. नभा काकडे या होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन फाउंडेशनच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे, सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, सायबर क्राईमच्या सोलापूर शहरच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रांजली काळे, सोमपा फायर ब्रिगेडचे अधिकारी अच्युत दुधाळ, सारथी फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे हे होते.
पुढे बोलताना डॉ. शहा म्हणाल्या की, यावर्षीच्या प्रकल्पाच्या कार्यकाळात ‘युथ पार्लिमेंट’ ही संकल्पना राबवून युवकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरित केले जाईल. पूरग्रस्त ग्रामीण भागातील युवक व युवतींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन आपदा मित्र व अपदा सखींची टीम तयार करणार आहोत. या कार्यामुळे भविष्यातील येणाऱ्या आपत्तीत वित्त व जीवित हानी होणार नाही.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत डॉ. नभा काकडे यांनी सर्वंकष लैंगिक शिक्षण व शिक्षकांची भूमिका, शक्तिसागर ढोले यांनी आपत्ती व्यवस्थापन व युवक, रामचंद्र वाघमारे यांनी युवा वर्गातील वाढते कॅन्सरचे प्रमाण व उपाय, वीरेंद्र परदेशी यांनी युथ पार्लमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण 60 शिक्षक व सामाजिक संस्थांच्या प्रशिक्षकांनी सहभाग नोंदविला होता.
सुरुवातीला डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक श्रीकांत येळेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन वीरेंद्र परदेशी यांनी केले तर आभार वैशाली बनसोडे यांनी मानले.
ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स या कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना डॉ. सुहासिनी शहा, डॉ. श्रीकांत येळेगावकर डॉ. नभा काकडे, शक्तीसागर ढोले, वैशाली बनसोडे,अच्युत दुधाळ, प्रांजली काळे, सुगतरत्न गायकवाड व वीरेंद्र परदेशी दिसत आहेत.
























