सोलापूरकरांचा वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून सोलापूर ते उजनी अशी ११० किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. सध्या ८८ किमी काम पूर्ण झाले असून आता राहिलेले काम पूर्ण व्हायला नोव्हेंबर उजाडेल, अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरकरांचा पाणीप्रश्न न सुटल्यास भाजपला या निवडणुकीतही फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपने आत्मचिंतन करीत पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मागील लोकसभेला २९ हजारांपर्यंत लीडवर असलेल्या भाजपला याठिकाणी मताधिक्य राखता आले नाही.
दुसरीकडे ‘शहर उत्तर’मध्ये देखील काँग्रेसने ७१ हजारांवर मते घेतली. दक्षिण सोलापुरातूनही काँग्रेसला एक लाख पाच हजारांवर मते आहेत. विशेष म्हणजे शहरातील अडीच विधानसभा मतदारसंघावरच भाजपला विजय सोपा वाटत होता. मात्र, तिन्ही ठिकाणी भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यासाठी सोलापूरचा पाणीप्रश्न व रोजगार, विमानसेवा हे तिन्ही मुद्दे कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदारांना पुन्हा विजय मिळवायचा असल्यास या मुद्द्यांचा प्राधान्याने निपटारा करावाच लागणार आहे. पण, रोजगारासाठी आयटी उद्योगासह अन्य उद्योग सुरू होणे अपेक्षित आहेत.