भाजपसाठी प्रतिष्ठा आणि काँग्रेससाठी अस्तित्व पणाला लागलेल्या सोलापूर लोकसभा लढतीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारून भाजपचा गड खेचून आणला आहे. त्यांच्या विजयामुळे सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर भाजपलाही पराभवाची कारणे शोधताना झालेल्या चुकांचे निराकरण करावे लागणार आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला गणल्या गेलेल्या सोलापुरात काँग्रेसअंतर्गत गटबाजी, डळमळीत जनाधार आणि कमकुवत होत गेलेल्या पक्ष संघटनेचा लाभ घेत भाजपने सोलापूरचा किल्ला सर करण्यात यश मिळविले होते विशेषत: २०१४ सालच्या मोदी लाटेनंतर भाजपने मागे वळून पाहिले नव्हते. विधानसभा निवडणुकीतही भाजपची ताकद वाढली असता त्यास पूरक म्हणून २०१७ सालच्या सोलापूर महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भाजपने चढती कमान ठेवली होती. यातच जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबीयांची साथ भाजपला मिळाली होती.