पंढरपूर – शहरातील अवैध गायी, बैलांची कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्या दुकानांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी येथील गोरक्षकांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी येथील मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना देखील निवेदन दिले आहे.
दरम्यान येथील गोरक्षकांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, पंढरपूर ही श्री विठ्ठल-रुक्मिणींची पवित्र नगरी असून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
या पावन भूमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवतो. अशा या पवित्र नगरीत अलीकडील काळात अत्यंत गंभीर आणि वेदनादायक प्रकार घडत आहेत.
पंढरपूर शहरात हाकेच्या अंतरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत जुनी पेठ व सांगोला चौक ते गोपाळपूर रोड पाण्याच्या टाकी खाली या दोन्ही ठिकाणी गायी व बैलांची कत्तल करून दररोज गोमांसाची उघडपणे विक्री करत आहे. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग करणारा नसून, संपूर्ण हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा आणि पंढरपूरच्या पावित्र्यावर घाला घालणारा आहे. विठुरायाच्या नगरीत अशा प्रकारचे कृत्य होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे आणि यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व अस्वस्थता निर्माण होत आहे.
सदर प्रकरणात यापूर्वी पंढरपूर शहर व ग्रामीण पोलिसांच्या मदतीने सदर दोन्ही व्यक्ती व दुकानांवर दोन वेळा कायदेशीर कारवाई करुन मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त करण्यात आले होते. परंतु अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे, त्या कारवाईनंतरही संबंधितांकडून पुन्हा त्याच प्रकारे गोमांस विक्री सुरू करण्यात आली आहे. यावरून संबंधित व्यक्तींना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, तसेच प्रशासनाच्या कारवाईचा कोणताही प्रभाव पडलेला नाही, सदर दुकाने ही पूर्णपणे अनधिकृत असून त्यांना कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना हा व्यवसाय सुरू आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारांना वेळेवर आळा घातला नाही, तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
या अत्यंत गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन अवैध कत्तल व गोमांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, तसेच संबंधित दुकाने उध्वस्त करण्यात यावीत. याशिवाय या बेकायदेशीर कृत्यामागील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचे धाडस करणार नाही.
पंढरपूरसारख्या पवित्र नगरीचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा अबाधित राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सदर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ दोन्ही दुकाने उध्वस्त करण्यात यावेत यासाठी पंढरपूर नगरपरिषदचे मा. मुख्याधिकारी तसेच तहसीलदारयांची समक्ष भेट घेऊन लेखी पत्र दिले. यावेळी पालिकेचे नगरसेवक सौरभ थिटे पाटील, प्रताप साळुंखे, अवधूत घाटे आदी गोरक्षक उपस्थित होते.

























