सांगोला – गुरुवार दि.१९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोला पंचायत समितीच्या नूतन सभापती पुनम इंगवले व उपसभापती अजय सरगर यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील, माजी जि.प.अध्यक्ष जयमाला गायकवाड, जि.प.सदस्य चेतनसिंह केदार, दादासाहेब लवटे, सदस्या शोभा खटकाळे, युवासेनेचे सागर पाटील, बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, संभाजी आलदर, बाळासाहेब काटकर, सचिन देशमुख, तानाजी पाटील, अनिल खडतरे, शिवाजीराव गायकवाड, पं.स.सदस्य राणी पाटील, सोनाली पाटील, बाळासाहेब बंडगर, अशोक चोरमुले, बापू जावीर, डॉ.सदाशिव दबडे, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
पदग्रहण सोहळ्यानंतर नूतन सभापती व उपसभापतींच्या हस्ते पंचायत समितीच्या विविध योजना अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेशाचे तसेच दिव्यांग बांधवांना त्यांच्यासाठी उपयोगी असणाऱ्या साधनांचे वाटप करण्यात आले.
पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सांगोला तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना हेलपाटे मारायची वेळ येऊ देऊ नका असा कानमंत्र याप्रसंगी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी देत राज्याला आदर्शवत असणारा सांगोला पॅटर्न तयार करून राज्याच्या समोर ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
























