सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सोलापुरात काँग्रेससह तीन पक्षांना आणखी एक धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले सी.ए. विनोद भोसले यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक राजकीय यांचे सुपुत्र ओंकार राजगे तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राहिलेले रविकांत कांबळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
प्रभाग क्रमांक १५ सह सोलापुरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा जनसंपर्क असलेले, दोन पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले विनोद भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकी वेळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, काही दिवसांपूर्वी श्रीदेवी फुलारे तर शनिवारी विनोद भोसले यांनी भाजपात जाणे पसंत केले. त्यामुळे भाजपाच्या दृष्टीने काहीसा अवघड असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मधील तीन विद्यमान काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे भाजपाचा प्रभाग क्रमांक १५ च्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.


























