सोलापूर – हिंदू धर्मातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात खतावणी बनवण्याचे काम जोमाने सुरू आहे. कारागीर खतावणी, रोजमेळ बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. व्यापार असो अथवा संसार आज दररोजचा हिशोब ठेवावाच लागतो. त्याशिवाय आपला मेळ बसतच नाही. आज जरी संगणक युग असला तरी व्यापारी लोकांची ओढ रोजमेळ व खतावणीकडे कायम आहे. व्यापार कोणताही असो आपला रोजचा व्यवहारिक ताळमेळ व्यापारी रोजमेळमध्ये नोंद केल्यानंतरच समजतो. व्यापारी आपला व्यवहार डायरेक्ट संगणकावर करू शकत नाही. त्यासाठी आधी रोजमेळ लागतो. नंतर रोजमेळ वरून खतावणी वर त्याची नोंद होते.त्यामुळे आपला हिशोब लगेच सापडतो.
दरम्यान, अडत व्यापारी, किराणा भुसार व्यापारी,कापड दुकानं,सराफ व्यापारी व छोटे मोठे व्यापारी अशा वह्या वापरतात. श्रावण हा पवित्र महिना समजला जातो. म्हणून या कामाची सुरुवात श्रावण महिन्यापासून होतो.बाहेरगावचे व्यापारी आपली वह्यांची ऑर्डर श्रावण महिन्यात तर गावातील व्यापारी दसऱ्याच्या मुहूर्तावर ऑर्डर नोंदवतात व धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी करतात. व्यापारी वह्यांनाच आपली लक्ष्मी मानतात म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धने, गूळ खाऊन खरेदी केलेले वह्यांचा गठ्ठा आपल्या डोक्यावर घेऊन जाण्याची परंपरा आजही टिकून आहे.
चौकट
वह्यांचे प्रकार
रोजमेळ, जमानावे, देशी खतावणी, इंग्लिश खतावणी, छापील खतावणी,कापडी कोयर बुक,पोणिया, मार्केट बुक, लेटर बुक, लक्ष्मी वही यांची किंमत कोयर नुसार ठरते. १ कोयर पासून मागणी प्रमाणे बनवून दिले जाते.
चौकट
जुन्या पारंपारिक वहयांचे प्रकार व साईझ
३पानी रोजमेळ व खतावणी, ४ पानी जांगड, एक्सरसाईझ उभा व आडवा टिपडा, २८×३० रोज व खतावणी या वहयांना मागणीप्रमाणे गादीपुठ्ठा, पडमपुठ्ठा, खारवापुठ्ठयामध्ये बनविले जाते. यांचे दर दस्त्यावरून ठरते. या वह्यांना ६सळ, ८सळ, १० सळ असे पानावर सळ मारले जातात.पाव दस्त्या पासून ते मागणी नुसार बनवून दिले जाते.
चौकट
वह्या बांधणीचे प्रकार
गादी पुठ्ठा व पडम पुठ्ठाचे वह्या डोकी शिलाई, मधी शिलाई, कुलकर्णी शिलाई, पंचकडी शिलाई व कर्नाटकातील गदग बांधणीच्या वह्याही बांधणी केले जाते.