सोलापूर – आयुष्यात कितीही पुण्यकर्म केले; परंतु अधर्माचा प्रतिकार केला नाही, तर पुण्याचा क्षय होतो. अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचे माध्यम आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत हेच मार्गदर्शन अर्जुनाला केले होते आणि कलियुगातही भगवंताचे हेच मार्गदर्शन हिंदूंसाठी मार्गदर्शक आहे. आताच्या काळातही हिंदूंसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. जागतिक पातळीपासून आता सर्वत्र युद्धजन्य स्थिती आहे. त्यामुळे हिंदूंनी धर्मरक्षणार्थ कृती करणे हाच उपाय आहे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा यांनी केले. ते सोलापूर येथे ११ मार्च या दिवशी जयभवानी प्रशालेच्या मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.
या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी हजारो हिंदूंनी उपस्थिती दाखवून हिंदूंच्या संघटितपणाचा अविष्कार दाखवून दिला. सामूहिक ‘वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली! प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले. या सभेत हिंदूंनी विविध प्रसंगांमध्ये स्वरक्षण कसे करावे याची विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा समितीच्या अलका व्हनमारे यांनी मांडला.
लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा पुढे म्हणाले, ‘‘इतिहासात अनेक सत्यवादी लोक होऊन गेले; परंतु इतिहास नेहमी शक्तीसमवेत असतो. इतिहास नेहमी पराक्रमाला लक्षात ठेवतो ! प्रभु श्रीरामाला मर्यादापुरुषोत्तम, सत्यवादी, क्षमाशील म्हणून आपण ओळखतो; परंतु राक्षसांना नष्ट केल्यामुळेच त्याची ओळख आहे. धर्मयुद्धासाठी आपल्यामध्ये पराक्रम आणि शक्ती असायलाच हवी. ‘अधर्माचा नाश करण्यासाठी धर्मयुद्धाचा स्वीकार कर’, हाच श्रीकृष्णाचा संदेश आहे. त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठी लढणे, हेच सर्वश्रेष्ठ युद्ध आहे, यापेक्षा कोणतेही पवित्र कार्य नाही. त्यामुळे आजही कौरव असतील, तर आपल्याला त्यांनी धर्मयुद्धाची संधी दिली आहे, याविषयी भगवंताप्रती कृतज्ञ रहावे; कारण धर्मयुद्धातूनच मोक्षप्राप्ती होते.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘घरच्या घरी करता येतील असे होमिओपॅथी उपचार’, या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.


























