पिलीव – महाराष्ट्र शासनाच्या कला, क्रीडा व शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून निवड झालेल्या माळशिरस तालुक्यातील जि.प. प्राथमिक केंद्रशाळा पिलीव येथे विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने आयडियल सेंटरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गांधी, उपाध्यक्षा सौ. प्रियांका रजपूत व पत्रकार सुजित सातपुते यांच्या हस्ते या व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या युगात सक्षम विद्यार्थी घडावेत, लहान वयातच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची माहीती व्हावी, आधुनिक युगात सर्व क्षेत्रातील माहीती असणारे परिपूर्ण विद्यार्थी घडावेत , भविष्यात आयटी तसेच तंत्रज्ञान युक्त विद्यार्थी घडावेत या दृष्टीने ही व्हर्चुअल लॅब शाळेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील शाळेमध्ये अशा प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असून शाळेच्या पटसंख्येतही वाढ होईल,अशी भावना पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नाना मदने यांनी या क्लासरूमसाठी स्वखर्चाने AC बसवून देणार असल्याचे जाहीर केले.त्यामुळे नाना मदने यांचे सर्व शिक्षक व उपस्थित पालक यांनी आभार व्यक्त करून अभिनंदन केले, सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समीती सदस्य हनुमंत पिसे,समशेरसिंग रजपूत,महिला सदस्या अश्विनी वगरे,शोभा वाघमारे, स्नेहल लेंगरे,तसेच मयूर वाघमारे, विजय देवकर,जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,प्रा.संजय पाटील, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
पिलीव केंद्र शाळेला होतकरू शिक्षकांचा स्टाफ लाभला आहे,त्यामुळे मुलांच्या गुणवत्तेत वाढ होत असून पिलीव केंद्र शाळेला पालकांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे._
























