आव्हाना / जालना – आव्हाना गावामध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे गावाची सुरक्षितता धोक्यात आली असून या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात गावाच्या प्रत्येक चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तात्काळ बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी गावातील एका नागरिकाच्या राहत्या घराजवळून ट्रॅक्टरची बॅटरी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. तसेच गावातून उभ्या असलेल्या मोटरसायकलीमधून पेट्रोल चोरीला जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. रात्री घराबाहेर काही साहित्य ठेवले असता तेही चोरीस जात असल्याचे अनेक अनुभव ग्रामस्थांनी सांगितले.
या सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचे चित्र आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे हा प्रभावी उपाय ठरू शकतो, असे ग्रामस्थांचे मत आहे.
यासोबतच गावातील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता प्रत्येक वर्गात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे अत्यावश्यक असल्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे शाळेतील शिस्त, सुरक्षितता तसेच कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा बसू शकतो.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, चोरीच्या वाढत्या घटनांचा गांभीर्याने विचार करून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रात्रीची गस्त वाढविणे व पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून गावाची सुरक्षा मजबूत करण्यात यावी, अशी मागणी तंटामुक्ती समिती. अध्यक्ष दत्तात्रय पाटील ठाले . मा.तंटामुक्ती मुकत्तार बागवान , सामाजिक कार्यकर्ते ईश्वर पांढरे,युवराज पाटील गावंडे, सुभाष गावंडे, नाना गुंजाळ , आत्माराम पांढरे , यानी निवेदन दिले आहे.हि मागणी लावकर करण्यात यावी अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.


























