अंडर-19 विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना ५ वेळा चॅम्पियन असलेल्या टीम इंडियाशी होणार आहे. उभय संघांमधील हा अंतिम सामना रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे. अशा स्थितीत अंतिम सामनाही अतिशय रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यादरम्यान ऑसी संघ आणि टीम इंडिया दोन वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने या दोन्ही वेळेस अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर ती ९व्यांदा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या काळात संघाचा विक्रम अतिशय उत्कृष्ट राहिला आहे. आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारत पाच वेळा चॅम्पियन बनला आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रिक करणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार, ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा सामना दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला कांगारू संघाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी असेल. २०१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना झाला होता. यानंतर २०१८ मध्ये दोन्ही संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. दोन्ही वेळा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत चॅम्पियन ठरली. अशा स्थितीत भारताच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या वरचढ आहे. याचसोबत वनडे विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑसी संघाकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्यासाठी ज्युनियर टीम इंडियाकडे सुवर्णसंधी आहे.