किनवट / नांदेड – नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत महायुती करून निवडणूक लढवली. या महायुतीअंतर्गत झालेल्या जागावाटपाच्या वाटाघाटीत प्रभाग क्रमांक 8 मधून माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार यांना भाजपाकडून अधिकृत ए.बी. फॉर्म जोडून उमेदवारी देण्यात आली होती.
मात्र अंतिम टप्प्यात सदर प्रभागाची जागा ही युतीच्या निर्णयानुसार शिवसेना (शिंदे गट) यांना सोडण्यात आल्याने, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार अजय चाडावार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष बाब म्हणजे उमेदवारी मागे घेत असताना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना स्वीकृत सदस्य पदाबाबत स्पष्ट ग्वाही दिली होती. ही ग्वाही महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही घटक पक्षांकडून देण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अजय चाडावार यांनी युतीधर्म पाळत आणि वरिष्ठांचा आदेश मान्य करत घेतलेला हा निर्णय महायुतीतील शिस्त आणि समन्वय दर्शविणारा मानला जात आहे. मात्र आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना महायुतीकडून प्रत्यक्षात स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात स्थान दिले जाणार की नाही, याकडे शहरातील जाणकार राजकीय व्यक्तींचे लक्ष लागले आहे.
अजय चाडावार हे आर्य वैश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून आतापर्यंत नगर परिषद सभागृहात कार्यरत होते. आर्य वैश्य समाजाचा नगर परिषदेत दीर्घकाळ प्रभावी राजकीय इतिहास राहिला आहे. या समाजाचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून स्वर्गीय मधुकरराव वट्टमवार यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच शंकरराव चाडावार हे उपनगराध्यक्ष तर दिनकर चाडावार हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. मागील अनेक दशकांत आर्य वैश्य समाजाचे प्रतिनिधित्व सातत्याने नगर परिषद सभागृहात राहिलेले आहे.
आर्य वैश्य समाज हा भाजपाचा पारंपरिक आणि विश्वासू मतदार वर्ग मानला जातो. त्यामुळे अजय चाडावार यांना सभागृहात सामावून घेतले गेले नाही, तर नगर परिषदेत आर्य वैश्य समाजाचे नेतृत्व इतिहासात प्रथमच संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे राजकीय व सामाजिक परिणामही दूरगामी असू शकतात.
एकंदरीत, उमेदवारी मागे घेताना दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी महायुतीकडून होते की नाही, यावरच किनवट शहरातील राजकीय समीकरणे आणि सामाजिक समतोल अवलंबून राहणार असून, संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आता महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

























