दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्ये शुभमन गिल फेल होतं आहे. पण तरीही रोहित शर्माने शुभमन गिलला पाठिंबा दिला आहे. पाहूया कर्णधार नेमकं काय म्हणाला.
टीम इंडियाला ३ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना खेळायचा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीत खराब कामगिरी केल्यानंतर युवा फलंदाज शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रोत्साहित केले आहे. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये गिलची कामगिरी निराशाजनक आहे, त्यामुळे या नव्या भूमिकेत त्याच्यासमोर लय शोधण्याचे मोठे आव्हान आहे.
रोहित शर्माने दुस-या कसोटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘सलामी आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी यात फारसा फरक नाही. तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी फक्त १ चेंडू लागतो आणि कधी जर सलामीवीर जखमी झाल्यास तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाला डावाची सुरुवात करावी लागते. मला या दोन्हीमध्ये फारसा फरक दिसत नाही. गिल हुशार आहे आणि त्याच्या फलंदाजीची त्याला खूप चांगली समज आहे.
शुभमन गिलने २०२३ मध्ये कसोटीत संघर्ष सुरूच ठेवला, त्याच्या नवीन फलंदाजीच्या क्रमामुळे कठीण परिस्थितींचा त्याला सामना करावा लागला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शतक झळकावल्यानंतर गिलला वर्षभरात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. शुभमन गिलने वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालसोबत सलामी दिली. २०२३ मध्ये कसोटीमधील गिलची एकूण कामगिरी निराशाजनक होती, त्याने ११ डावात केवळ २५८ धावा केल्या.
रोहित पुढे म्हणाला- त्याला या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये याच क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याने कसोटी आणि मर्यादित षटकांमध्ये सलामी दिली आहे, परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कारणे ही त्याची निवड आहे. या क्रमांकावर तो संघासाठी चांगली कामगिरी करू शकेल असे त्याला वाटते. विशिष्ट संख्यांबद्दल तुम्ही कसा विचार करता ही वैयक्तिक गोष्ट आहे….’
स्वतःबद्दल सांगताना रोहित शर्मा म्हणाला, ‘मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला मला बिलकुल आवडत नाही आणि हे माझे मत आहे. एकतर तुम्ही डावाची सुरुवात करून द्या किंवा फलंदाजीसाठी थोडी वाट पहा. जेव्हापासून मी सलामीसाठी उतरणे सुरू केले आहे, तिसऱ्या ते सातव्या क्रमांकापर्यंत मला वाटत नाही की ही कोणासाठीही हे योग्य स्थान आहे.’ रोहितच्या या वक्तव्यावर सगळेच हसले.