सोलापूर – दमानी नगरासह अनेक लोक वस्त्यांना शहराशी जोडणारा ब्रिटिश कालीन रेल्वे ओव्हर ब्रिज पूलाने रविवारी सोलापूरकरांचा निरोप घेतला. सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत रेल्वे इलेक्ट्रीक लाईन खाली आणले. १०.३० वाजल्यापासून पुलावरील चुना, वाळूचे बांधकाम ब्रेकरने तोडकाम. पुलाच्या खाली २० गर्डर आहेत, ते क्रेनच्या साह्याने पाच टप्प्यांत काढले. ५ वाजण्याच्या दरम्यान पूर्णपणे पूल पाडण्यात आला. सोलापूर यार्ड मधील रेल्वे किमी 544 / 4 – 5 येथे असलेला हा पूल 1922 साली बांधण्यात आला होता. नवीन पूलाचे आयुर्मान 100 वर्षाचे राहणार असून पन्नास वर्षानंतर किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे.
विघटनादरम्यान जमिनीवरील वायर्स ट्रॅक पॉइंट्स आणि यंत्रसामग्रीचे संरक्षण करण्यासाठी प्लायवूड, सीट्स, स्टील प्लेट्स, लोखंडी ब्लॉग्स तसेच वाळूने भरलेले एचडीपी पिशव्या वापरण्यात आल्या. हेवी ड्युटी ब्रेकर एक्सकेटर आणि गॅस कटरच्या साह्याने गर्डर कापले गेले.
पुलावरील एकूण दहा गर्डर पाच टप्प्यात काढले गेले. प्रत्येक टप्प्यात दोन गर्डर उचलले गेले. भैया चौक व मरीआई चौकाच्या दोन्ही टोकांवर प्रत्येकी एक 200 मेट्रिक टन क्रेन कार्यरत राहणार होत्या तर मरीआई चौकाच्या टोकावर तिसरी क्रेन स्टॅन्ड बाय ठेवण्यात आली.
या संपूर्ण मोहिमे साठी सुमारे 80 ते 100 कामगार प्रत्यक्ष घटनास्थळी कार्यरत होते. तर ओएचइ कमी करणे व पुनर्सचयित करण्यासाठी टीआरडीच्या देखरेखी खाली 70 ते 80 कामगार तयार होते. याशिवाय क्रेन ऑपरेटर, वाहतचनलक, रेल्वे अभियंते, एनएचएआईचे पर्यवेक्षण कर्मचारी यांचा ही समावेश होता. विघटन प्रक्रिया पूर्ण होताच रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू होणार आहे.
असा असणार नवीन पूल; लगतच्या इमारतीसाठी सेवा रस्ता यू टर्न सुविधा देण्यात येणार
दमानी नगरचा रेल्वे पूल पाडल्यानंतर त्याजागी 19 मीटर रुंदीचा आधुनिक चार पदरी नवीन रोड ओवर ब्रिज उभारण्यात येणार आहे. यामध्ये 18.8 मीटरचे अतिरिक्त व्हायाडक्ट, 36 मीटरचा मुख्य स्पॅन, 24 मीटरचा अतिरिक्त रेल्वे स्पेन आणि पुन्हा 18.8 मीटरचा व्हायाडक्ट असा संयुक्त आराखडा आहे.
नवीन पुलाचे बांधकाम सुमारे एका वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असून लगतच्या इमारतीसाठी दोन्ही बाजूंना 5.5 मीटर रुंदीची सेवा रस्ता यू टर्न सुविधा आणि परिसरातील समुदायांच्या सोयींसाठी आवश्यक व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे.
पाडकामापूर्वी या तीन गाड्या झाल्या मार्गस्थ
पाडकामापूर्वी सोलापूर रेल्वे विभागातील हुतात्मा एक्सप्रेस, वंदेभारत, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि कोकणची एक रेल्वे या गाड्या मार्गरस्थ झाल्या. त्यानंतर पाडकामास सुरुवात झाली. सोलापूरकरांची गैरसोय होऊ नये याची काळजी सोलापूर रेल्वे विभागाच्यावतीने घेण्यात आली होती.
गेल्या २० वर्ष जुनी लक्ष्मी चाळ शेजारी राहत असून पुला वर आम्ही आयुष्यभर ये जा केलाय , लहानपणापासून वयाच्या ७७ पर्यंत हाच पूल आमचा साथीदार होता. भक्कम आधार होता. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून असच भक्कम पूल बांधावा. आनंद आहे आम्हाला. लोकांच्या सोयीसाठी सुधारणा होणे गरजेचे.
– मधुकर सुरवसे
पूल आमच्या पिढीसाठी केवळ रस्ता नव्हता, तर ती एक ऐतिहासिक आठवण आहे. लहानपणी या पुलावरून कितीतरी वेळा रेल्वेच्या शिट्या ऐकल्या आहेत. पाडताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, पण मनात थोडी हुरहुर वाटली. विकासासाठी हे आवश्यक होतं, पण या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत.
– दिपक भोसले
शहराची वाढती लोकसंख्या आणि गरजा पाहता, हा बदल अपरिहार्य होता. सोलापूरची ओळख असलेल्या या पुलाला निरोप देणे थोडे जड गेले. नवीन पूल वेळेत आणि दर्जेदार व्हावा, सोलापूरचा विकास अधिक वेगाने होईल, हीच अपेक्षा आहे.
– विशाल चंदेले
लगेचच रुळावरील मलबा काढणे केले सुरू
पूल पडल्यानंतर रेल्वे रुळावर पडलेला मलबा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले होते. ८ नंतर च्या रेल्वे च्या गाड्या येण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू होते.

























