बार्शी – शहरातील नालंदा बुद्ध विहार येथे नालंदा बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने ‘हर घर रमाई, घर घर रमाई’ हा अभिनव उपक्रम राबवून समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करुन झाली. त्यानंतर माता रमाई आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पूज्य भंते सुमेधजी नागसेन यांचे प्रमुख सानिध्य लाभले. त्यांनी उपस्थितांना धम्मदेशना देऊन शुभाशीर्वाद दिले. प्रमुख वक्ते प्रा. जयद्रथ गायकवाड यांनी माता रमाईंच्या त्यागाचा इतिहास मांडताना सांगितले की, प्रत्येक घरात माता रमाईंची खरी प्रतिमा असणे ही काळाची गरज आहे.
चित्रपट आणि मालिकांमुळे अनेकदा माता रमाईंची खरी ओळख पुसली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, शासनाच्या ‘रमाई आवास योजने’तून घरे मिळतात, पण तिथे माता रमाईंचा फोटो नसतो, ही बाब निदर्शनास आल्यावर संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या ५ ते ६ वर्षांत बार्शी शहर व तालुक्यातील प्रत्येक घरात माता रमाईंची प्रतिमा पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. देणगीदारांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या प्रतिमांचे यावेळी वाटप करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमासाठी रमेश संतराम गवळी, अभिमान वाघमारे (पेंटर), बाबासाहेब वाघमारे, संजय भालेराव, सुरज कांबळे, बाबासाहेब भालेराव, अविनाश काळेगावकर, पांडुरंग शिंदे, मोरे, केदार, अकबर शेख, नागनाथ सोनवणे आणि संजय सरवदे या मान्यवरांनी सहकार्य व प्रतिमा दान केले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
यामध्ये प्रामुख्याने सुशीला बागडे, अनुराधा ओहोळ, चांदणी गवळी, मैनाबाई अंकुशराव, लता कसबे, लता वाघमारे, साधना वाघमारे, सुजाता कदम, अनिता भालेराव, विद्या वाघमारे, वंदना चंदनशिवे, शोभा किरतकर्वे, उल्का चंदनशिवे, नंदा अय्यर, सुमन बोकेफोडे, जयश्री गायकवाड, प्रतिभा भातंबरेकर, कल्पना भातंबरेकर, शांताबाई जानराव, रंजना बोकेफोडे, कविता मस्के, मरीता काकडे व बनसोडे (धाराशीव) आदींचा समावेश होता. कार्यक्रमात शाहीर राजेश ननवरे यांनी माता रमाईंच्या जीवनावर आधारित भीमगीते सादर करून सर्वांची मने जिंकली.
























