मंगळवेढा – बसस्थानकावरुन जाणार्या मंगळवेढा-जत या बसमध्ये चढताना एका 46 वर्षीय महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले 10 लाख 8 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मंगळवेढा बसस्थानकावरील प्रवाशांचे दागिने चोरण्याची मालिका संपता संपत नसल्यामुळे प्रवाशी वर्ग धास्तावला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी महिला स्नेहा रामचंद्र शिंदेे (वय 46,रा.जुळे सोलापूर) ही तिच्या मुलाबाळासह व तिचा दीर पिराजी शिंदे (रा.यळवी ता.जत) यांच्यासह सोलापूर येथून सकाळी 11.30 वाजता फिर्यादी सोलापूर-सांगोला बसमध्ये बसून मंगळवेढ्याकडे निघाली होती. यावेळी सीटवर बसल्यानंतर तिच्या पर्समध्ये 10 लाख 8 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे विविध दागिने ठेवले होते. दुपारी 1.30 वाजता मंगळवेढा येथील बसस्थानकावर उतरल्यानंतर पर्समध्ये ठेवलेले दागिने आहेत का ? याची खातरजमा केल्यावर दागिने होते. दुपारी 2 वाजता मंगळवेढा-जत या बसमध्ये बसल्यावर पर्स मांडीवर ठेवून पर्सची चैन बंद केलेली होती. त्यावेळी फिर्यादीने पर्समध्ये सोने आहे हे पाहण्यासाठी पर्सची चैन उघडून पाहिल्यावर त्यामधील ठेवलेले सोने दिसून आले नाही.
यावेळी खात्री पटली की अज्ञात चोरट्याने पर्सची चैन उघडून चोरुन नेले आहे. यामध्ये 1 लाख 92 हजार 500 रुपये किंमतीचे गंठण,70 हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण,77 हजार रुपये किंमतीच्या बांगड्या,21 हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स,3 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 50 गॅ्रम वजनाच्या बांगड्या,1 लाख 19 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रासलेट,1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे लॉकेट, 42 हजार रुपये किंमतीचे 6 ग्रॅम वजनाचे लॉकेट,17 हजार 500 रुपये किंमतीचे वेढणी अंगठी,14 हजार रुपये किंमतीचे दोन नग वेढणी अंगठी असा एकूण 10 लाख 8 हजार रुपये किंमतीचा पर्स मध्ये ठेवलेला सोन्याचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान दुपारी घडलेली चोरीची घटना रात्री उशीरा दाखल झाली आहे. ठाणे अंमलदाराने सुरुवातीला गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याने मोठा विलंब झाला. तक्रारदाराने व अन्य सुज्ञ नागरिकांनी थेट पोलीस अधिक्षक यांना या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बसस्थानकावर यापुर्वी अनेक महिलांचे दागिने चोरण्याचा प्रकार घडला असून चोरीची नोंद पोलीसात होते मात्र त्याचा आजतागायत चोरीचा तपास पोलीसांनी न लावल्यामुळे चोरीची मालिका थांबता थांबेना अशी म्हणण्याची वेळ नागरिकावर येत आहे. मागील चार दिवसापुर्वीच तेथे दागिने चोरण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. येथे नेमलेले पोलीस ड्यूटी दरम्यान जाग्यावर थांबत नसल्यामुळे चोरटे याचा फायदा घेवून आपले उखळ पांढरे करत असल्याच्या तक्रारी आहेत. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपुर्वक लक्ष घालून येथील पोलीस प्रशासनास मार्गदर्शन करुन येथील होणार्या चोर्या थांबवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे,पोलीस हवालदार रवी माने,पोलीस अंमलदार मनोज राठोड, सुरज रामगोंडे यांचे पथक मंगळवेढ्यात सोमवारी दाखल झाले. या पथकाने बसस्थानकामधील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करुन सदर चोरीचा तपास करण्याचा विशेष प्रयत्न केला. रात्री उशीरा पर्यंत हे पथक बसस्थानकावर ठाण मांडून होते.
















