पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा देश विकसित करायचा आहे, त्यांच्या या प्रगतीच्या यात्रेत आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसुद्धा असला पाहिजे, म्हणूनच आपण विकासासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवू या असे आवाहन भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी जिल्हा व्यापारी आघाडीच्या मेळाव्यात केले.
राणे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या विकास यात्रेमध्ये कोकणचा आपला हक्काचा खासदार असावा यासाठी इथे आपल्याला आवाहन करायला मी आलो आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भारताचे आर्थिक उत्पन्न वाढावे, निर्यात वाढावी, परदेशी चलन वाढावे, यासाठी पंतप्रधानांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. देशासाठी नरेंद्र मोदी यांनी आपले आयुष्य वाहून घेतले आहे. प्रत्येक घटकाकडे त्यांचे लक्ष असते, करोना काळात देशातील जनतेच्या केवळ अन्नाची नव्हे तर त्यांच्या आरोग्य, निवास यासाठीही महत्त्वाची पावले उचलली आहेत. बंद पडलेले कारखाने, बेरोजगार झालेले कामगार यांच्यासाठी माझ्या खात्याला अर्थसाह्य करत बंद पडलेले उद्योगचक्र पुन्हा वेगाने सुरू केले आहे. देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे. भारत विकसित बनेल, महासत्ता बनेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. ५०० वर्षांच्या वनवासात असलेला राम आज अयोध्येत त्याच्या मंदिरात विराजमान झाला आहे आणि त्यांचे हे कार्य सुरूच आहे, म्हणूनच असे तपस्वी, दृढनिश्चयी व्यक्तिमत्त्व तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान पदी हवे आहे, असे नारायण राणे म्हणाले. कोकणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.