तभा वृत्तसेवा येरमाळा – ग्रामीण भागातील माध्यम व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी ४००० किलोमीटर अंतराची पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली.
येरमाळा येथे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजित पत्रकार संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, कळंब तालुका अध्यक्ष दिपक बारकुल, सचिन पाटील,अशोक शिंदे, बाळासाहेब जाधवर, सचिन बारकुल, दत्ता बारकुल, दीपक बारकुल, संतोष बारकुल, सुधीर लोमटे, सुखदेव गायके, दत्ता गायके, तानाजी बारकुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील माध्यम व्यवस्थेमध्ये काम करणारे पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोई सुविधा मिळत नाहीत. त्यात कोरोना नंतर माध्यम व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक मागण्या आहेत आणि त्या मागण्या संविधानिक अधिकाराच्या माध्यमातून आम्ही मागत आहोत. संवादामुळे परिवर्तन होऊ शकते यावर आमचा ठाम विश्वास आहे.
जेव्हा कुठेच न्याय मिळत नाही, तेव्हा सर्वसामान्य माणूस पत्रकारांकडे येतो आणि त्यांचे प्रश्न पत्रकार मांडतो. त्यातील अनेक प्रश्न सुटतात, मात्र सरकारची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांवरच आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने जर पत्रकारांचे प्रश्न सुटणार नसतील तर पत्रकारांना आपल्याकडील मतांची ताकद दाखवावी लागेल असे ते म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांचा सत्कार करण्यात आला. येरमाळा येथील येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन ही पत्रकार संवाद यात्रा पुढे तुळजापूर येथे रवाना झाली.