लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा मते दूर जाण्याची भीती भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळेच आमदार एकनाथ खडसे यांच्यासारखा ओबीसी समाजातील ‘मास लीडर’ पुन्हा पक्षात आणून भाजपने ‘ओबीसी कार्ड’ खेळले आहे. खडसे कुठलीही निवडणूक लढवणार नसले, तरी लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्यापोठापाठ महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात त्यांचा ओबीसी समाजातील ‘मास लीडर’ म्हणून वापर करून विजयाचे गणित मांडण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून केला जात आहे.
भाजपला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व त्यांच्यानंतर एकनाथ खडसे यांनी तळगाळात रुजवण्याचे काम केले. हे दोन्ही नेते भाजपमधील ओबीसी समाजाचा चेहरा बनले. हे दोघे ‘मास लीडर’ त्या काळात भाजपचे नेतृत्व करत होते. भोसरी जमीन खरेदीप्रकरणात खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांचे आमदारकीचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांना देण्यात आले. त्यांचा पराभव झाला. त्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यावर आरोप करून भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. आता पुन्हा खडसे स्वगृही परतत आहेत.
अंतर्गत राजकारणापेक्षा विजयाला महत्त्व
राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस व त्यांचे खंदे समर्थक गिरीश महाजन यांचा विरोध डावलून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खडसे यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला, हे विशेष. भाजपने लोकसभेसाठी ‘४०० पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे एक-एक जागा महत्त्वाची आहे. अंतर्गत राजकारणापेक्षा निवडणुकीतील विजय भाजपसाठी महत्त्वाचा असल्याने खडसे यांचे केंद्रीय नेतृत्वाने स्वागत केले.
मराठा मतांचे नुकसान भरून काढणार
महाराष्ट्रात भाजपला फारसे अनुकूल नसलेले वातावरण तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजातील मते दूर जाण्याची भीती आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आता भाजपकडून ओबीसी कार्ड खेळले जात आहे. पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यापाठोपाठ छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी हेतूपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांत चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचे वाढलेले महत्त्व यापाठोपाठ भाजप नेत्यांवर टोकाची टीका करणाऱ्या खडसे यांच्यासाठी घातलेल्या पायघड्या यावरून भाजपकडून ओबीसी नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
विधानसभेसाठीही फायदा
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने खडसे तेथे ताकद लावतीलच. मात्र, जळगाव मतदारसंघात भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खडसे यांची मदत होईल. तेथील लेवा समाजावर असलेला खडसे यांचा प्रभाव त्यासाठी कामी येईल. त्यांना सोबत घेतल्याने महाराष्ट्रातील ओबीसी समाजात सकारात्मक संदेश गेल्याने विधानसभा निवडणुकीतही ओबीसी प्रभाव असलेल्या मतदारसंघांत फायद्याचे गणित भाजपने यानिमित्त मांडले आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, रावेर या चार मतदारसंघांतही खडसेंच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळेल.
महाजन यांना अटकाव
एकनाथ खडसे भाजपचे जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या विरोधानंतरही खडसे यांचा भाजपप्रवेश म्हणजे गिरीश महाजन यांना केंद्रीय नेतृत्वाकडून वेसण घालण्याचा प्रयत्न मानला जात आहे. अंतर्गत राजकारणामुळे पक्षाचे नुकसान सहन केले जाणार नाही, असा संदेशच महाजन यांना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला आहे.