सोलापूर – शिक्षण, कला, आणि संस्कृत अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोलापूर येथील किरण जोशी आणि त्यांच्या पत्नी प्रा. सौ. दुर्गा जोशी यांना कराड (जि. सातारा) येथे नुकत्याच झालेल्या ‘गौरवगाथा सन्मान सोहळा’मध्ये राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारच्या अभियानांतर्गत आयोजित या सोहळ्यात, राज्याच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
*किरण जोशी यांना ‘राज्यस्तरीय शिवराजमुद्रा’ पुरस्कार*
सोलापूरचे किरण जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला, लघुचित्रपट व नाट्य क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ‘राज्यस्तरीय शिवराजमुद्रा’ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि राष्ट्र उभारणीसाठी शैक्षणिक परिवर्तनाचा महामेरु रचण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
*प्रा. सौ. दुर्गा जोशी यांना ‘संस्कृत अध्यापन सेवा पुरस्कार*
किरण जोशी यांच्या पत्नी प्रा. सौ. दुर्गा जोशी यांना राज्यस्तरीय ‘संस्कृत अध्यापन सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांनी संस्कृत अध्यापन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. बालवर्गापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना त्यांनी संस्कृत भाषेतून, प्रयोगशील अध्यापनातून उत्तम मार्गदर्शन केले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण अध्यापन कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप फेटा, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते.
या गौरवशाली सोहळ्यासाठी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ चित्रपटातील हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे राजन गवस, हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते व मृणालिनी मोहिते, कमांडर डॉक्टर राजकुमार पारे (सातारा), आणि डॉ. बी. एन. खरात आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जोशी दाम्पत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोलापूरच्या या कर्तृत्ववान दाम्पत्याच्या सन्मानामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दोघांनाही मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
——————–

























