सोलापूर – वाशी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘महापौर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर याने बाजी मारत विजेतेपद पटकावले. या अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत सोलापूरचा पंचाक्षरी लोणार उपविजेता ठरला.
या स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे वाशी येथे करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या सुमारे १५७ स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला. विशेषतः विजेतेपदासाठी सोलापूर आणि कोल्हापूरच्या खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
लोणारची सुवर्ण कामगिरी
सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार याने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आणि त्यानंतर झालेल्या ‘विजेत्यांच्या विजेते’ फेरीत उपविजेतेपदावर मोहोर उमटवली. लोणार हा सोलापूरच्या ‘इलेजियम क्लब’चा खेळाडू आहे.
पंचाक्षरी लोणारचे जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

























