सोलापूर – क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ, सोलापूर यांच्या वतीने आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 14 नोव्हेंबर 2025 रोजी २३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये यावर्षीच्या जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मा. खंडू आप्पा बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश अप्पा पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस युवा नेते गोविंद भाऊ कांबळे, माजी नगरसेवक अमर पुदाले, मातंग समाजाचे नेते अनिल आप्पा बनसोडे, युवा नेते शेखर कांबळे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर नूतन उत्सव समिती अध्यक्ष खंडू आप्पा बनसोडे यांनी , ” लहुजींच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास करण्यासाठी तरुणांना प्रेरित करू आणि या वर्षीचा जयंती उत्सव विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करू. ” या शब्दात आपले मत व्यक्त केले.
मध्यवर्तीचे संस्थापक सुरेश पाटोळे यांनी , “आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या देशसेवेचे, शैक्षणिक, सामाजिक समतेच्या कार्याची ओळख मंडळाच्या वतीने वर्षभर करून देण्यात येते.आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी ‘जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी’ हा जयघोष करत भारतीय सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात आपल्या तालमीत अनेक युद्ध तयार केले. त्याचप्रमाणे जातीयता अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सामाजिक समतेचे ही धडे दिले. त्यामुळे त्यांच्या तालमीत शिक्षण घेतलेल्या अनेक तरुणांनी क्रांतिकारी कार्याबरोबरच समाजसेवेचेही कार्य केले. त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा जपण्याचे काम मध्यवर्ती समिती करत आहे. ” या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.


















