सोलापूर – शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा महेश गादेकर हे विराजमान झाले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या आदेशानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महेश गादेकर यांच्या नियुक्तीचे पत्र सुपूर्द केल्यानंतर अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर महेश गादेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महेश गादेकर म्हणाले, ज्यांची विचारसरणी पक्षाच्या विचारसरणीशी सुसंगत राहत नाही.महत्त्वकांक्षी आणि सत्तेचा लाभ असणारे अनेक कार्यकर्ते पक्ष आदलाबदली करतात. त्यामुळे आयाराम आणि गयाराम यांच्यावर पक्ष चालत नाही. पक्षाची स्वतःची अशी विचारसरणी आयडालॉजी असते. त्याच विचाराच्या आधारे पक्ष चालवला जातो. शरद पवार यांची विचारसरणी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावर पक्ष चालतो. आम्ही पहिल्यापासूनच हे विचार अंगी बांधलेली आहेत. पुरोगामी विचारसरणीचे आम्ही शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. कोणाच्या जाण्याने किंवा येण्याने पक्ष संपत नाही. काही प्रमाणात फरक पडतो परंतु, नव्या दमाने आणि नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून आगामी निवडणूक सर्व ताकदीनिशी लढण्याचा विश्वास यावेळी महेश गादेकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करताना विचारलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तर देताना गादेकर यांनी जुन्या कार्यकर्त्यांचा तसेच नव्या इच्छुकांचा आदर करत सर्वांचे विचार एक संघ करून त्यातून मार्ग काढावा लागतो. त्यासाठी चातुर्य लागते. परंतु काहीजणांमध्ये हे चातुर्य नसते. त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोड्या आणि राजकारण सुरू होते. असा टोलाही त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना लगावला.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जुन्या मातब्बर मंडळींचा विश्वास संपादन करून तसेच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीची व्यूव्हरचना आखू वेळ कमी आहे, मात्र काम जास्त आहे. त्यासाठी झोकून देऊन निवडणूक लढवू. ज्या प्रभागात शरद पवार यांच्या विचारसरणीचे प्रभुत्व आहे. त्या ठिकाणी निश्चितच विजय होईलच, परंतु ज्या प्रभागात पक्षाची ताकद कमी आहे. त्या ठिकाणी उभारी देण्याचे काम करू, मात्र महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे आव्हान आमच्यासमोर असणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर जिल्हा ओळखला जातो. परंतु आता पुन्हा ते गतवैभव परत आणण्यासाठी प्रयत्नची पराकाष्ठा करू. असेही महेश गादेकर यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी पक्षाच्यावतीने महेश गादेकर यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी माजी महापौर जनार्दन कारमपुरी, प्रदेश उपाध्यक्ष भरत जाधव, शंकर पाटील,माजी महापौर यू एन बेरिया, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, शहर युवक अध्यक्ष सर्फराज शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुका आघाडी किंवा स्वबळावर लढण्याची तयारी
सध्या नगरपालिका नगरपरिषद यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत आज जाहीर होईल. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच आघाडी किंवा स्वबळावाची तयारी याबाबत निर्णय घेतला जाईल. काँग्रेस तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत आघाडी करायची असेल तर वरिष्ठ स्तरावरून सूचना आल्यानंतर तशी बोलणी सुरू होईल.
पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचे होणारे इनकमिंग
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून इतर पक्षात गेलेले काही जुने कार्यकर्ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. महेश गादेकर यांच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसे चित्र हॉटेल सिटीपार्क येथे दिसले. शिंदे सेनेत गेलेल्या सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे आदी महिला कार्यकर्त्या पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी गादेकर यांना विचारल्यास, काही कार्यकर्ते तसेच पदाधिकारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी देण्यास तयार असल्याचे सांगताना घराची वाट विसरलेला व्यक्ती पुन्हा एकदा घरी आला. तर तो बाहेरचा होणार नाही. असे देखील गादेकर यांनी उद्देशून सांगितले. त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इन्कमिंगचे खरे चित्र समोर येणार आहे.
शरद पवार सोलापूर दौऱ्यावर
नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मुलाच्या लग्न दि.१६ नोव्हेंबर रोजी जुनी मिल कंपाऊंड येथील मैदानावर होणार आहे. महेश गादेकर यांच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण शरद पवार यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे शरद पवार हे दि. १६ नोव्हेंबर रोजी लग्नासाठी सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित झाल्याचे महेश गादेकर यांनी सांगितले.




















