सोलापूर : रंगभवन येथील कीर्तीस्तंभ परिसरात लाईट, सुरक्षा व स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन परिसराची पाहणी केली.
यावेळी भारतीय जैन संघटना, अतिशय क्षेत्र 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कुमठे, सकल जैन समाज, जैन सोशल ग्रुप, बाहुबली मंदिर विजापूर रोड, नमोकार सामाजिक संघटना, आस्था रोटी बँक, आचार्य शांतिसागर युवा संघटना, ज्ञानदीप महिला मंडळ, जैन कासार समाज, जैन कासार विकास प्रतिष्ठान आदी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी महापौरांकडे विविध मागण्या मांडल्या.
रंगभवन येथील कीर्तीस्तंभ परिसरात कायमस्वरूपी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, नियमित स्वच्छता ठेवण्यात यावी तसेच बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. काहीजण येथे येऊन वाढदिवस साजरे करत असल्याने त्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशीही मागणी सामाजिक संघटनांनी केली.महापौर विनायक कोंड्याल यांनी या सर्व मागण्यांची दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील तसेच रंगभवन येथील कीर्तीस्तंभ परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यासाठी महानगरपालिका सकारात्मक पावले उचलेल असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी श्याम पाटील (राज्य कार्यकारणी सदस्य, भारतीय जैन संघटना), सुनील गांधी (अध्यक्ष, आदिनाथ जैन मंदिर ट्रस्ट), अभिनंदन विभूते (विभागीय उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटना), परागभाई गांधी (संचालक, सिद्धोहम ज्वेलर्स), आनंद तालीकोटी (आस्था रोटी बँक), प्रा. मनीष शहा, देशभूषण वसाळे (जिल्हाध्यक्ष, भारतीय जैन संघटना), पंडित माणिक उपाध्ये (नमोकार सामाजिक संघटना), वालचंद पाटील (सचिव, जैन मंदिर कुमठे), प्रा. धन्यकुमार बिराजदार (संचालक, कासार सोसायटी), विक्रांत बशेट्टी हिराचंद कासार (सदस्य, भारतीय जैन संघटना), आशुतोष शहा, स्नेहा वनकुद्रे, प्रिया पाटील, मंगल पांढरे, श्रद्धा शहा, सुहास शहा कोठारी, अरविंद शहा (संचालक, आदिनाथ जैन मंदिर ट्रस्ट) आदी उपस्थित होते.
























