सोलापूर – चिंचोली एमआयडीसी परिसरात किंवा नजीकच्या परिसरात दीर्घ काळापासून राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात किंवा नजिकच्या परिसरात दीर्घ काळापासून वास्तव्यास असलेले स्थानिक भूमिपुत्र रहिवासी आहेत. त्यांच्या जमिनीचा व परिसराचा उपयोग औद्योगिक विकासासाठी म्हणजेच एमआयडीसीसाठी करण्यात आला. ज्यामुळे येथील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. स्थानिक लोकांना रोजगारांमध्ये प्राधान्य मिळावे हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचे शहर आहे व एमआयडीसी हा रोजगाराचा आपल्या जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठा आधार आहे. इतर कुठलेही मोठे रोजगार आपल्या सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध नाहीत परंतु इथल्या भूमिपुत्रांना कंपन्यातील नोकऱ्यांमध्ये डावलले जाते. त्यांना रोजगार दिला जात नाही याउलट इतर राज्यातील तरुणांनाच रोजगार दिले जात आहेत त्यामुळे स्थानिक तरुणांना तसेच बेरोजगार ठेवले जात आहे यामुळे आणखी बेरोजगारीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे.
यासाठी कामगार कायद्याचे आणि स्थानिक रोजगार धोरणाचे पालन करून चिंचोली एमआयडीसी परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार देऊन न्याय मिळवून द्यावा व इतर राज्यातून जे कामगार कामासाठी घेतले जातात त्यांचे कागदपत्र त्यांची ओळख व्यवस्थित केली जाते की नाही याची शहानिशा केली जावी. जर असे झाले नाही तर याच भूमिपुत्रांना सोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महानगर प्रमुख शिरीष जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश कदम, मनीषा कोळी, जयश्री जाधव, सुनीता घंटे, शिखर भोसले, संतोष सुरवसे, सिद्धाराम सावळे व सतीश वावरे आदी उपस्थित होते.

























