सोलापूर – वीजग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्याच्या दिशेने ‘महावितरण’ने महत्त्वाचे निर्णय घेत वीजबिलावरील ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाइन अर्जाना आता स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ग्राहकांना घरबसल्या, जलद आणि पारदर्शक सेवा मिळणार असून, पूर्वी एक महिना लागणारी ही प्रक्रिया आता केवळ तीन ते सात दिवसांत पूर्ण होणार आहे, अशी माहिती ‘महावितरण’च्या जनसंपर्क विभागाकडून दिली आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’च्या डिजिटल सेवेत ग्राहकाभिमुख बदल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीजबिलातील नावबदल अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी नव्याने विकसित केलेली ऑनलाइन प्रणाली आता कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आपल्या नावात बदल करण्यासाठी कोणताही आटापिटा करावा लागणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या नव्या प्रणालीमुळे प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्राहकांना कार्यालयीन फेऱ्यांची गरज न पडता घरबसल्या सेवा मिळणार आहे. यामुळे वेळ, श्रम व खर्च वाचणार आहे.
असा करा नावात बदल
घर, दुकान किंवा इतर मालमत्तेच्या खरेदी-विक्री,वारसा हक्क अथवा इतर कारणांमुळे मालकीत बदल झाल्यानंतर वीजबिलावरील ग्राहक नावात बदल करण्याची आवश्यकता निर्माण होते. यासाठी महावितरणच्या मोबाईल अॅप किंवा www. mahadiscom.in या संकेतस्थळावर लॉग-इन करून ग्राहकांना ऑनलाइन अर्ज सादर करता येतो. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व प्रक्रिया शुल्क भरल्यावर ही कार्यवाही सुरू होते.
वीजभारवाढीच्या अर्जाना मंजुरी
‘महावितरण’ने याआधी लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्यास प्रारंभ केला होता. गेल्या महिन्यात २४६० औद्योगिक व ४१६४ इतर ग्राहकांनी एका क्लिकवर वीज भारात तब्बल २२ हजार किलोवॉटने वाढ केली आहे.
सात दिवसांत मंजुरी
राज्य विद्युत नियामक आयोगाच्या कृती मानकांनुसार या प्रक्रियेस एक महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, ‘महावितरण’ने आता ही प्रक्रिया स्वयंचलित केल्यामुळे ग्राहकांना केवळ तीन ते सात दिवसांत मंजुरी मिळेल. तसेच अर्ज व कागदपत्रांची तपासणीत काही त्रुटी असल्यास ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे माहिती देऊन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही ग्राहकांना संदेश पाठला जाईल.
















