पंढरपूर – नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी परिचारकांच्या पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक महादेव धोत्रे यांची तर परिचारकांच्याच नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष आघाडीकडून स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मणराव शिरसाट ॲड.सुनील वाळूजकर सौरभ थिटे यांची निवड करण्यात आली. या सर्वांच्या निवडी नंतर समर्थक, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पंढरपूर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.१६) पालिकेच्या सभागृहात संपन्न झाली. पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके या सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डाँ.महेश रोकडे तसेच पालिकेचे इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
दरम्यान पंढरपूर नगरपालिके मध्ये परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे २४ नगरसेवक निवडून आलेले होते. तर विरोधी तिर्थक्षेत्र विकास आघाडीला केवळ ११ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. या मध्ये विशेष बाब म्हणजे तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डाँ.प्रणिता भालके या प्रचंड फरकाने निवडून आल्या.
दरम्यान आज पार पडलेल्या पालिकेच्या पहिल्या सभेमध्ये परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक महादेव धोत्रे यांची उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या गटाकडून सर्वानुमते नाव निश्चित करण्यात आले. त्या नंतर धोत्रे यांनी उपनगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान पालिकेतील विरोधी तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उपनगराध्यक्षपदासाठी एक देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके यांनी महादेव धोत्रे यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर केली.
उपनगराध्यक्षपदाची निवड होणार असल्यामुळे परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच त्यांच्या शहरविकास आघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर मोठी गर्दी केलेली होती. धोत्रे यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकज जल्लोष केला. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करुन फटाके देखील फोडण्यात आले.
त्या नंतर पालिकेत माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे प्रमुख तथा युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारकांनी महादेव धोत्रे तसेच त्यांच्या आघाडीकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीनही स्विकृत नगरसेवकांचे पेढे भरवुन तसेच पुष्पहार घालून अभिनंदन केले. उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांच्या निवडीनंतर त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गटनेते भागवत बडवे व सुजित सर्वगोड भारतीय जनता पार्टीचे व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते
——————————
स्विकृत सदस्यांचे देखील अभिनंदन )
परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीतर्फे स्वीकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, ॲड सुनील वाळूजकर आणि सौरभ थिटे यांची देखील निवड करण्यात आली. यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे व नवीन स्वीकृत सदस्य लक्ष्मणराव शिरसट, अँड.सुनील वाळूजकर सौरभ थिटे सत्कार करण्यात आले.
——————
समित्यांच्या निवडीकडे लक्ष )
पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडी नंतर पालिकेच्या विविध समित्यांच्या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. संख्याबळा नुसार सर्व समित्यांवर परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा तसेच त्यांच्या आघाडींचाच वरचष्मा राहणार हे निश्चित आहे. तरी देखील समित्यांच्या सभापतीपदी त्यांच्या गटाच्या कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


















