——————
मंगळवेढा – गडचिरोली येथिल नाट्यश्री कलामंचाचा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङमय पुरस्कार स्मिता प्रविण जडे यांच्या ‘ रुजता हलकेच ‘या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. अशी माहिती संयोजक चुडाराम बल्हारपुरे यानी दिली आहे.
या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते आणि गडचिरोली इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रचित सावकार पोरेड्डीवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी गडचिरोली इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात होणार आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. असेही बल्हारपुरे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर शाखेने हे पुस्तक प्रकाशित केले असुन स्मिता जडे यांचे पहिलेच पुस्तक आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ कवियत्री प्रा.मनिषा पाटील यांची प्रस्तावना असुन पाठराखण ज्येष्ठ साहित्यिका डाॅ.स्मिता पाटील यांनी केली आहे. अर्थपुर्ण मुखपृष्ठ अंधळगावच्या चित्रकार निकिता पाटील यानी रेखाटले आहे. त्यांना मिळालेले या पुरस्काराबद्दल साहित्य वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



















