सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध पाँडिचेरी या क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर महाराष्ट्राने पहिल्या डावात 95 षटकात 8 बाद 336 धावा केल्या असून पॉंडिचेरी संघावर 156 धावांची आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात कालची नाबाद जोडी हर्ष मोगावीरा व कप्तान सचिन धस यांनी खेळ पुढे सुरू ठेवत 49 धावांची भागीदारी रचली. 60 धावा झाल्या असताना आकाश पी. याने हर्ष (27)ला शिशिरकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या दिग्विजय पाटील सोबत सचिन धसने उपयुक्त फलंदाजी करत स्वतःचे सलग दुसरे अर्धशतक झळकावले. दोघात 59 धावांची भागीदारी झालेली असताना सचिन (54) नमन शर्माद्वारे त्रिफळा बाद झाला. जेवणाला खेळ थांबला तेंव्हा 161/3 (39 षटके) अशी धावसंख्या झालेली.
किरण चोरमले सोबत दिग्विजयने दमदार फलंदाजी करत 53 धावांची भागीदारी रचत अर्धशतक लगावले. किरण चोरमले (16) देखील नमन शर्माद्वारे त्रिफळाबाद झाला. त्यानंतर आलेल्या अभिषेक पवार सोबत दिग्विजयने 44 धावांची भागीदारी रचली. नमन शर्माने पृथ्वी खन्ना द्वारे अभिषेक (10) ला झेल बाद केले. त्यानंतर आलेल्या अजय बोरुडे सोबत प्रभावी फलंदाजी करत दिग्विजयने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकाविले. चहापानाला काहीच वेळ शिल्लक असताना दिग्विजय (110 धावा, 145 चेंडू, 17 चौकार, 1 षटकार) शिशिरद्वारे पायचीत झाला.
तिसऱ्या सत्रात अजय बोरुडे स्वराज चव्हाण सोबत संथ फलंदाजी करत असताना कप्तान नितीन प्रणवने स्वराज (14)ला कारथीराजाद्वारे झेलबाद केले व त्यानंतर आलेला शुभम मेड (8) नमन शर्माचा 5वा बळी ठरला तो आकाश पी.द्वारे झेलबाद झाल्याने. तळातील खेळाडू वैभव दारकुंडे सोबत अजय बोरुडेने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करत दिवस अखेर धावसंख्या 300 पार नेली. दिवसातील 90 षटके पूर्ण झाल्यावर पंचांनी खेळ थांबविला तेव्हा 8 बाद 336 धावा करत महाराष्ट्राने पहिल्या डावात आघाडी घेतली असून उद्या पहिल्या सत्रात शेवटचे 2 खेळाडू आणखीन किती धावा जोडून आघाडी वाढवितात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नमन शर्माला गोलंदाजी मध्ये साथ देत नितीन प्रणव, आकाश पी, शिशिर एच आर.यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
——
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांकडून तसेच सामन्यातील पंच, गुणलेखक, अधिकारी यांचे वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दंडावरती काळी फीत लावून दिवसभर खेळ केला. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने विविध समित्या या सामन्यासाठी कार्यरत असून सर्वांचे कडून अतिशय उत्तम नियोजन केले असल्याचे पाहुण्या पांडिचेरी संघाचे व्यवस्थापक श्री.रामदासी यांनी सांगितले.

























