अकलूज – अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ सोलापूर ग्रामीण जिल्हा संघटनेच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रलंबित परताव्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. परतावा तात्काळ न मिळाल्यास सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील धान्य वाटप बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी नोव्हेंबर 2022 व डिसेंबर 2022 मध्ये चलनाद्वारे रोख भरणा केला होता. मात्र 1 जानेवारी 2023 पासून केंद्र शासनाकडून मोफत धान्य वाटपाची घोषणा झाल्यानंतर दुकानदारांची भरलेली हक्काची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या रकमेच्या परताव्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयापासून मंत्रालय स्तरापर्यंत वारंवार पाठपुरावा करण्यात येत असूनही अद्याप परतावा मिळालेला नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
या संदर्भात अन्न व नागरी ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. तसेच विभागाचे सहसचिव संतोष गायकवाड यांच्याशीही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, ई-पॉस मशीन संदर्भातील अडचणीही निवेदनात मांडण्यात आल्या. मागील चार महिन्यांपासून बसविण्यात आलेल्या नवीन ‘एल-वन’ स्कॅनरमुळे अनेक ग्राहकांचे बोटांचे ठसे उमटत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. परिणामी, ओटीपीच्या माध्यमातून धान्य वितरण करावे लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्यास ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. वयोवृद्ध ग्राहकांकडे मोबाईल नसल्याने त्यांना धान्य देताना मोठ्या अडचणी येत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. या तांत्रिक अडचणींवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली अरुण जाधव व अक्षय मिले उपस्थित होते. हक्काचा परतावा मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार असून गरज पडल्यास धान्य वितरण बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
























