उदगीर / लातूर – समर्थांनी दिलेला बलोपासनेचा मंत्र व राष्ट्रीय जागरणासाठी केलेले प्रयत्न हे राष्ट्रीय कार्यासाठी पूरक ठरले असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले . मलकापूर येथील श्री समर्थ रामदास स्वामी मठ संस्थांनच्या सभामंडपाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते . रामदास स्वामीजींचे वंशज व रामदासी संस्थान सातारा चे अध्यक्ष ह . भ . प . बाळासाहेब स्वामी,
ज्योत्स्नाताई कोल्हटकर, शंकरलिंग मठाचे मठाधिश सुखदेव स्वामी, मलकापूरचे सरपंच गुरुनाथ बिरादार प्रल्हादबुवा रामदासी,उद्धव महाराज हैबतपूरे ,समीर लिमये हे यावेळी उपस्थित होते .
राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या पादुकांचे आगमन व मलकापूर येथील रामदास स्वामी मठाच्या सभागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आ. संजय बनसोडे व राम भक्तांच्या उपस्थितीत झाला . ह.भ.प. अतुल रामदासी यांनी प्रास्ताविक केले .अनिकेत रामदासी यांनी संकल्पित असलेल्या बांधकामाविषयी माहिती दिली .
राष्ट्र हा विषय कायम आपल्या अग्रस्थानी असला पाहिजे .रामदास स्वामींनी राष्ट्रासाठी राष्ट्रीय विचार घेऊन बलशाली मातृभूमीसाठी बलशाली नागरिक निर्माण करण्यासाठी आपले योगदान दिले .मनाचे श्लोक , दासबोध या ग्रंथातून त्यांनी दिलेली शिकवण मानवाने कसे जगावे याचा बोध आहे .रामदास स्वामींच्या प्रेरणेतून प्रल्हाद बुवा रामदासी व त्यांचा परिवार ज्या समर्पित भावनेने काम करतो आहे ते कार्य व समर्पण वंदनीय असल्याचे आमदार बनसोडे पुढे बोलताना म्हणाले .
या उपक्रमासाठी आपण १५ लाख रुपयेआमदार निधीची रक्कम देणार असल्याचे सांगून या कामासाठी सतत सहकार्य करू व मदत करू असे आश्वासन आमदार बनसोडे यांनी यावेळी बोलताना दिले . संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातील मठाधिपती या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य महेश तोडकर यांच्यासह रामदास भक्तांनी परिश्रम घेतले .
रामकार्यात सहकार्य करा – सुखदेव स्वामी
उदगीर येथे रामदास स्वामींच्या या मठाच्या भव्य दिव्य बांधकामासाठी उदगीर करांनी व समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन सुखदेव स्वामी महाराज यांनी याप्रसंगी बोलताना केले . हे कार्य रामाचे कार्य असून या कार्याला मदत म्हणजे राम सेवा आहे असे सुखदेव महाराज म्हणाले .

















