सोलापूर : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर विनायक कोंड्याल यांनी दाखविलेल्या धडाकेबाज नेतृत्वामुळे संपूर्ण सभागृहात शिस्त, समन्वय आणि निर्णयक्षमतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ‘चौकार-षटकार’ शैलीत सभा चालवत त्यांनी तब्बल ५२ विषयांना एकमताने मंजुरी मिळवून एकप्रकारे विक्रमच घडविला.
एक धुरंदर महापौर म्हणून विनायक कोंड्याल यांची चर्चा होत आहे.
मागील सभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या वेळी महापौरांनी सुरुवातीलाच कडक भूमिका घेत सभागृहाची शिस्त अबाधित ठेवण्याचा स्पष्ट इशारा दिला. सभागृहात शिस्त आणि शांतता राखा अन्यथा संबंधितांना सभा सभागृहाबाहेर काढले जाईल अशी तंबीच महापौरांनी दिली. या ठाम भूमिकेचा परिणाम असा झाला की, संपूर्ण सभा शांत, संयमी आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. प्रत्येक नगरसेवकाला आपले मत मांडण्याची समान संधी देत कोंड्याल यांनी लोकशाही मूल्यांचे उत्तम उदाहरण घालून दिले.सभेत पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधा अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, सर्व ५२ विषयांना एकमताने मंजुरी मिळाल्यामुळे शहर विकासाच्या दृष्टीने ही सभा ऐतिहासिक ठरली आहे.
विरोधकांनी मांडलेल्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कर सवलत योजना’ विषयावर सत्ताधाऱ्यांनी ठोस माहिती मांडत ही योजना २०१९ पासून लागू असल्याचे स्पष्ट केले. लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या विषयातही कोंड्याल यांनी समन्वयाचा आदर्श दाखवत श्री सिद्धरामेश्वर देवस्थान आणि होटगी ब्रह्मठ मठ यांच्यात संतुलित निर्णय घेतला. समाजहिताला प्राधान्य देत “या विषयात राजकारण करू नये” असा स्पष्ट संदेशही त्यांनी सभागृहाला दिला. याशिवाय, महापालिकेच्या शाळांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती उभारण्याचा निर्णय, नगरोत्थान योजनेअंतर्गत कोट्यवधींच्या रस्ते कामांना मंजुरी, तसेच नगरसेवकांना प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी ओळख बिल्ला देण्याचा निर्णय हे या सभेतील ठळक निर्णय ठरले.सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनीही महापौरांना भक्कम साथ दिल्यामुळे सर्व निर्णय वेगाने आणि एकमताने पार पडले.
या सभेत महापौर विनायक कोंड्याल यांनी दाखविलेली प्रशासकीय पकड, समन्वय कौशल्य आणि निर्णयक्षमता यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. ‘गोंधळातून शिस्तीकडे’ आणि ‘वादातून विकासाकडे’ नेणारी ही सभा कोंड्याल यांच्या नेतृत्वाची प्रभावी छाप उमटवून गेली. एक धुरंदर महापौर म्हणून त्यांची चर्चा होत आहे.























