बार्शी – बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना, आज अचानकपणे प्रभाग क्रमांक ७ ब मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या उमेदवार निवेदिता जीवनदत्त आरगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या शिंदेसेनेच्या उमेदवार मीरा शीतल नाळे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या २१ नोव्हेंबर रोजीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर, ज्या उमेदवारांच्या हरकती आहेत आणि कोर्टात अपील परिस्थिती आहे अशा उमेदवारांसाठी अर्ज माघार घेण्याची मुदत २५ नोव्हेंबर होती. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मीरा शीतल नाळे यांची थेट दुरंगी लढत असलेल्या विरोधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार निवेदिता जीवनदत्त आरगडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत, सुचकाच्या खोट्या सही असल्याचा दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल येण्याआधीच आज निवेदिता आरगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे शिवसेनेच्या मीरा शीतल नाळे या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पद व २१ प्रभागातील नगरसेवक पदाच्या ४२ जागांच्या निवडणुकीत एक जागा बिनविरोध झाल्याने आता ४१ जागांची निवडणूक होणार आहे. पक्षीय बलाबल पाहता महायुती भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत गटाने या निवडणुकीत एक जागा बिनविरोध करत आघाडी घेतली आहे. उर्वरित नगराध्यक्ष पद व ४१ जागांकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार दिलीप सोपल व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांचा गट आणि महायुतीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटात चुरशीची लढत होताना दिसत आहे.
बातमी सोबत फोटो मेल केलेला आहे.























