सोलापूर : वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूरच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या वालचंद सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव, शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान आणि शैक्षणिक गुणवत्तेचा उत्सव असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सत्यजित शहा (प्राचार्य, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर) व डॉ. अश्विन बोंदार्डे (प्राचार्य, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर) लाभले होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी होते. यावेळी , समारंभाचे निमंत्रक डॉ. ए. एम. महाजन, डॉ. के. आर. राव, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे तसेच स्वयंअर्थसहाय्य विभागाच्या समन्वयिका सौ. सारिका महिंद्रकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कु. सुकन्या साखरे हिने नमोकार महामंत्र व ‘आईगिरी नंदिनी’वर आधारित सादर केलेल्या भावपूर्ण नृत्याविष्काराने संपूर्ण सभागृह भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांनी स्वागत व प्रभावी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा सविस्तर परिचय डॉ. ए. एम. महाजन यांनी करून दिला, तर प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रमांचा सखोल व विश्लेषणात्मक वार्षिक अहवाल सादर केला. विविध बोर्ड परीक्षांतील निकाल, राज्य व विभागीय स्तरावरील क्रीडा यश तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा त्यांनी यावेळी मांडला.
यावेळी इयत्ता बारावीतील अनुष्का यशवंत बिराजदार, प्रज्ञा नरसिंह बांगड (अनुदानित कला विभाग) आणि अथर्व देवानंद गौर (स्वयंअर्थसहाय्य विज्ञान विभाग) यांना त्यांच्या सर्वांगीण प्रगती, शिस्तबद्ध वर्तणूक आणि नेतृत्वगुणांच्या आधारे आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वाचन उज्वला तांदळे, सौ. अंबिका माळी आणि आर. एस. हजारे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पसायदान प्रा. चेतन तुपकर यांनी केले. समारोप व आभारप्रदर्शन सारिका महिंद्रकर यांनी केले.


























