मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण दुष्काळी भागात एका बाजूने दुधाचे दर कमी झाले असताना दुसऱ्या बाजूने जनावराच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडल्याने उन्हाळ्यात वाटेल तेवढी किंमत मोजून देखील वेळेवर ओला व सुका चारा मिळणे कठीण झाले आहे.
त्यामुळे पशुपालक धास्तावले असून उन्हाळ्यात जनावरे कशी जगवायची? असा प्रश्न पशुपालकापुढे निर्माण झाला आहे.मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण दुष्काळी भागात गेल्यावर्षी अतिशय कमी पाऊस पडल्याने ज्वारीच पीक बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. ज्वारीचे पीकच न आल्याने जनावराच्या वैरणीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
दुष्काळी भागातील शेती ही पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्याने शेतकरी बांधव जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. जर्सी गायीसाठी ओल्या चाऱ्याबरोबर सुका चाराही तितकाच महत्त्वाचा असताना सध्या ऊस प्रतिटन ४००० रुपये तर कडबा व मक्याची सुकी वैरण १७०० ते २००० रुपये शेकडा झाल्याने पशुधन कसे जगवायचे? असा प्रश्न पडला आहे.एका बाजूने दुधाचे दर कमी झाले असताना जनावरे कशी सांभाळायची असा प्रश्न पशुपालक पुढे असताना दुसऱ्या बाजूने वाटेल तेवढी किंमत मोजून देखील वेळेवर ओला व वाळला चारा मिळणे दुरापास्त झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांवर चारा खरेदी करण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण दुष्काळी भागात दररोज गावोगावी टेम्पो, ट्रॅक्टर भरून कडब्याची व उसाची वाहतूक होत असून अतिशय महागड्या दराने चारा खरेदी करून पशुधन जगवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.